वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेन युद्धावरील संभाव्य शांतता करारासंदर्भात मोठा आणि वादग्रस्त दावा करत म्हटले आहे की, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन नव्हे तर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की करारात अडथळा आणत आहेत. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत ट्रम्प यांनी ही भूमिका मांडली असून, ती युरोपमधील अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांच्या भूमिकेच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. बुधवारी ओव्हल ऑफिसमध्ये बोलताना ट्रम्प म्हणाले की, जवळपास चार वर्षे सुरू असलेले युक्रेनवरील आक्रमण संपवण्यास पुतिन तयार आहेत. मला वाटते की पुतिन करार करण्यास तयार आहेत. मात्र युक्रेन त्यासाठी कमी उत्सुक दिसत आहे, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपमधील सर्वात मोठा भू-संघर्ष अद्याप का संपलेला नाही, असे विचारले असता ट्रम्प यांनी थेट उत्तर दिले, झेलेन्स्की यांच्यामुळेच अजूनही संघर्ष संपलेला नाही. या विधानांतून ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांच्याविषयी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे. दोन्ही नेत्यांमधील संबंध पूर्वीपासूनच तणावपूर्ण राहिले असले, तरी अलीकडील काळात संवादात काही सुधारणा झाल्याचे दिसत होते. मात्र ट्रम्प यांनी अनेकदा काही युरोपीय मित्र राष्ट्रांपेक्षा पुतिन यांच्या आश्वासनांवर अधिक विश्वास दाखवला असून, यामुळे किव्ह आणि युरोपीय राजधानींमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. वाटाघाटी आणि प्रादेशिक सवलतींचा मुद्दा अलीकडील अमेरिकेच्या नेतृत्वाखालील चर्चांमध्ये युद्धानंतरच्या युक्रेनसाठी आवश्यक असलेली सुरक्षा हमी हा मुख्य मुद्दा राहिला आहे. अमेरिकन वाटाघाटीकारांनी युक्रेनला कोणत्याही कराराचा भाग म्हणून पूर्वेकडील डोनबास प्रदेश सोडण्याचा दबाव आणल्याचे सांगितले जाते. मात्र झेलेन्स्की यांनी कोणत्याही प्रादेशिक सवलतीला स्पष्ट नकार दिला असून, देशाच्या संविधानानुसार अशी जमीन सोडणे अशक्य असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले आहे. पुढील आठवड्यात स्वित्झर्लंडमधील जागतिक आर्थिक मंचात झेलेन्स्की यांची भेट होणार का, असा प्रश्न विचारला असता ट्रम्प यांनी झेलेन्स्की तेथे असतील तर मी नक्कीच त्यांना भेटेन, असे स्पष्ट केले. तथापि, शांतता प्रक्रियेचा मार्ग अजूनही अनिश्चितच असल्याचे संकेत त्यांनी दिले.