Donald Trump : इराणकडून युद्धबंदीसाठीचा नवीन प्रस्ताव मिळाला असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी म्हटले आहे. काल इराणी शिष्टमंडळाबरोबरच्या वाटाघाटींच्या दुसऱ्या फेरीसाठी स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर यांच्याबरोबर अमेरिकेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ इस्लामाबादला जाणार होते. मात्र ट्रम्प (Donald Trump) यांनी संध्याकाळी उशिरा या शिष्टमंडळाचा पाकिस्तान दौरा अचानक रद्द केला. त्यानंतर थोड्याच वेळात ट्रम्पयांनी इराणकडून युद्धबंदीचा नवीन प्रस्ताव प्राप्त झाल्याचे म्हटले आहे. ठरल्याप्रमाणे इराणचे शिष्टमंडळ काल इस्लामाबादला आले होते. पण अमेरिकेच्या शिष्टमंडळाबरोबर कोणत्याही थेट चर्चेचे नियोजन नसल्याचे इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कीयान यांनी आगोदरच स्पष्ट केले होते. त्यानुसार पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्कर प्रमुख फिल्ड मार्शल आसिम मुनीर यांची भेट घेऊन इराणचे शिष्टमंडळ मायदेशी निघून गेले होते. Donald Trump इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ आता रविवारी (आज) पुन्हा पाकिस्तानला येण्याची शक्यता एका वृत्तसंस्थेने वर्तवली होती. अमेरिकेने आगोदर इराणच्या बंदरांची नाकाबंदी उठवावी. त्यानंतरच शांतता चर्चेची पुढची फेरी होऊ शकेल, असे पेझाश्कीयान यांनी रात्री शहबाज शरीफ यांना फोनवरून सांगितले. इस्लामाबादमधील व्यवहार पुन्हा सुरळीत… इराणी शिष्टमंडळ चर्चेविना इराणला परत गेले आणि अमेरिकेचे शिष्टमंडळ तर इस्लामाबादला आलेच नाही. त्यामुळे इस्लामाबादमधील दुसऱ्या फेरीची चर्चा होऊ शकली नाही. दोन दिवसांपासून सुरक्षा व्यवस्थेचा तणाव असलेल्या इस्लामाबादमध्ये आजपासून सर्वसामान्य व्यवहार नियमितपणे सुरू झाले आहेत. पर्यटनस्थळे, उद्याने आणि बस स्थानके पुन्हा खुली करण्यात आल्याचे पाक सरकारने सोशल मीडियावरून जाहीर केले. पण महत्वाची कार्यालये, सरकारी इमारती आणि अमेरिका-इराणच्या चर्चेचे नियोजित ठिकाण असलेल्या जिना हाऊसजवळील बंदोबस्त कायम आहे. इस्रायल-लेबनॉनमधील युद्धविरामाला ३ आठवड्यांचटी मुदतवाढ इस्रायल आणि लेबनॉनमध्ये पूर्वी झालेल्या १० दिवसांच्या युद्धविरामाची मुदत सोमवारी संपते आहे. मात्र दोन्ही देशांच्या राजदूतांमध्ये व्हाइट हाउसमध्ये झालेल्या दुसऱ्या फेरीच्या चर्चेनंतर दोन्ही देशांनी १० दिवसांच्या प्राथमिक युद्धविरामाला आणखी तीन आठवड्यांची मुदतवाढ देण्यास मान्यता दिली असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. दुसरीकडे ट्रम्प यांनी चीनमधील मोठ्या तेलशुद्धिकरण प्रकल्पावर आणि इराणी तेलाची वाहतूक करणाऱ्या ४० शिपींग कंपन्या, टँकरवर आर्थिक निर्बंध घातले आहेत. इराणमध्ये दहशतवादाबद्दल एकाला फाशी देशाच्या अग्नेयेकडील सिस्तान आणि बलुचिस्तान प्रांतात दहशतवादी कारवायांच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आलेल्या एका व्यक्तीला आज फाशी देण्यात आले. अमेर रमेश असे फाशी दिलेल्या व्यक्तीचे नाव असून कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेल्या त्याच्या शिक्षेवर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यानंतर या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात आली. त्याला कोठे, कधी फाशी दिले गेले आणि त्याला कधी अटक झाली होती, याचा खुलासा केला गेलेला नाही. अमेर रमेश हा जैश-अल-अदिल संघटनेचा सदस्य होता. ही संघटना बलुच लोकांना अधिक हक्क मिळावेत यासाठी कार्यरत आहे.