तैपेई : तैवानच्या तैतुंग या आग्नेयेकडील किनारी काउंटी प्रदेशाला बुधवारी ६.१ तीव्रतेचा भूकंप झाला. त्यामुळे राजधानी तैपेईच्या इमारती हादरल्या. तथापि, कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याची नोंद नाही. या भूकंपाची खोली ११.९ किमी होती, असे जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेसने म्हटले आहे. भूकंपाचे केंद्रबिंदू तैतुंग काउंटी हॉलपासून १०.१ किलोमीटर उत्तरेस होते. तैतुंग शहरात ५ श्रेणीच्या तीव्रतेची नोंद झाली, तर हुआलियन काउंटी आणि पिंगतुंग काउंटीमध्ये ४ श्रेणीच्या तीव्रतेची नोंद झाली. काओशुंग, नानटौ काउंटी, तैनान, चियायी काउंटी, युनलिन काउंटी, चियायी आणि चांगुआ काउंटी सारख्या ठिकाणी तीव्रतेची पातळी ३ इतकी होती. ताइचुंग, मियाओली काउंटी, यिलान काउंटी, सिंचू काउंटी, सिंचू, ताओयुआन, न्यू तैपेई आणि तैपेई येथे तीव्रतेची पातळी २ इतकी नोंदवण्यात आली. पेंगु काउंटीमध्ये १ तीव्रतेची पातळी नोंदविण्यात आली. तैवान भूगर्भातील दोन भूस्तरांच्या जोड असलेल्या ठिकाणाजवळ असल्याने येथे भूकंप होण्याची शक्यता जास्त असते. आज झालेल्या भूकंपामुळे जीवित अथवा मालमत्तेची हानी झाली नसली, तरी यामुळे २०१६ च्याविनाशकारी भूकंपाच्या आठवणी ताज्या झाल्या. २०१६ ला दक्षिण तैवानमध्ये झालेल्या भूकंपात किमान १०० ठार झाले होते. याशिवाय १९९९ मध्ये ७.३ रिश्टर स्केलच्या आणखी एका भूकंपात २००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.