तेहरान – इराणमधील ढासळत्या आर्थिक परिस्थितीमुळे जनतेमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, आता महिलांनी थेट सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्याविरोधात बंड पुकारले आहे. सध्या सोशल मीडियावर काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये इराणी महिला खामेनी यांच्या फोटोंना आग लावून त्यावर आपली सिगारेट पेटवताना दिसत आहेत. हे आंदोलन केवळ प्रतिकात्मक नसून, सत्ता आणि महिलांवर लादलेल्या जाचक धार्मिक निर्बंधांविरुद्ध पुकारलेले खुले युद्ध असल्याचे मानले जात आहे. इराणमध्ये सर्वोच्च नेत्याच्या प्रतिमेचा अवमान करणे हा गंभीर गुन्हा आहे. तसेच महिलांनी सार्वजनिक ठिकाणी हिजाबशिवाय वावरणे किंवा सिगारेट पिणे यावरही कडक बंदी आहे. अशा परिस्थितीत जीवाची पर्वा न करता महिलांनी केलेले हे कृत्य प्रशासनावरील वाढता राग व्यक्त करत आहे. महसा अमिनीच्या मृत्यूनंतर इराणमध्ये सुरू झालेला जनक्षोभ आता अधिक तीव्र झाला असून, महिलांनी अनिवार्य हिजाब आणि सामाजिक निर्बंधांना पूर्णपणे झुगारून दिले आहे. तज्ज्ञांच्या मते, इराणमधील हे आंदोलन खामेनी यांच्या सत्तेसाठी मोठे आव्हान ठरत आहे. देशातील भीषण आर्थिक संकट आणि लोकांचा वाढता विरोध पाहता प्रशासकीय यंत्रणा हतबल झाल्याचे चित्र आहे. सद्यस्थितीत हे आंदोलन थांबवणे खामेनी यांच्यासाठी अशक्य वाटत असून, वाढत्या दबावामुळे ते देश सोडू शकतात, अशा चर्चांनाही उधाण आले आहे. मात्र, सध्या या केवळ चर्चा असल्या तरी इराणमधील या परिस्थितीने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.