दमास्कस: सीरियामध्ये शुक्रवारी नमाजच्या वेळी एका मशिदीत झालेल्या स्फोटात ८ जणांचा मृत्यू झाला असून २१ हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. हा स्फोट अल्पसंख्याक ‘अलावाईट’ समुदायाची लोकसंख्या असलेल्या भागातील ‘इमाम अली बिन अबी तालिब’ मशिदीत घडवून आणण्यात आला. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, मशिदीत नमाजसाठी मोठी गर्दी जमलेली असताना हा हल्ला झाला. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, मशिदीच्या आत अज्ञात हल्लेखोरांनी स्फोटके (IED) पेरली होती. स्फोटानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून आपत्कालीन पथकांनी जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. सीरियाच्या गृह मंत्रालयाने या घटनेला ‘दहशतवादी कृत्य’ घोषित केले असून सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. सीरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. हा हल्ला म्हणजे मानवी मूल्यांवर केलेला आघात असून देशात अस्थिरता पसरवण्याचा हा एक अयशस्वी प्रयत्न असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. बशर अल-असद यांची सत्ता गेल्यानंतर सीरियामध्ये ‘हयात तहरीर अल-शाम’ सारख्या विद्रोही गटांच्या कारवाया वाढल्या आहेत. यामुळे देशातील जातीय आणि राजकीय तणाव पुन्हा एकदा वाढला असून, हा स्फोट त्याच संघर्षाचा भाग असल्याचे मानले जात आहे. या भ्याड हल्ल्यामागे कोणाचा हात आहे, याचा शोध सध्या सुरक्षा यंत्रणा घेत आहेत.