प्रभात वृत्तसेवा नेवासे – नेवासे नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी रंगात आलेली असून, माजीमंत्री शंकरराव गडाख, शिवसेनेचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते,माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे या तीन आजी – माजी आमदारांनी या नगरपंचायत निवडणुकीमध्ये आपल्या निष्ठावान समर्थक कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. नगराध्यक्षपदासह भावी नगरसेवकांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविलेले असताना नेवासेकर मंडळी आता शहराचा खऱ्या अर्थाने कोणी विकासच केलेला नसल्याचे उघडपणे स्पष्ट सांगत या सर्वपक्षीय राजकीय नेत्यांबाबत उघड बोटे मोडताना दिसून येत आहे.भावी नगराध्यक्षपदाचे उमेदवार आता मतदारांना शहराचा सर्वांगीण विकासाचा मुख्य अजेंडा निवडणूक रिंगणात मांडून विकासाचे ‘गाजर’ दाखविताना दिसून येत आहे. नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांबाबत ‘लबाड लांडग ढोंग करतय आणि शहर विकासाचे ढोंग करतय’? अशी उपहासात्मक टीका आता मतदारांतून या उमेदवारांवर उघडपणे केली जात आहे. विकासकामाच्या मुद्द्यावर नेवासेकरांतून आक्षेप घेत सर्वच नेत्यांवर आता उघडपणे राजकीय रणांगणात टीका होताना दिसून येत आहे.नेवासेकर जनता सर्वपक्षीय नेत्यांसह निवडणूक रिंगणात उभ्या असलेल्या उमेदवारांना मतदार आता स्पष्टपणे बोलू लागली आहे. शहराला पिण्यासाठी आठ – आठ दिवस पाणी येत नाही, साधी एक मुतारी बांधलेली नाही आणि आता पुन्हा विकासाचा मुद्दा आमच्यासमोर मांडून तुम्ही आम्हाला जर साधे पाणी सुद्धा लवकर देवू शकत नाहीत? मग विकासाच्या गप्पा कशाला? असा टोला मतदार भेटीसाठी आलेल्या उमेदवारांना लगावत त्यांची बोलती बंद करत आहे. विकासापेक्षा शहर भकासच झाल्याचे मतदारांतून बोलले जात असून, या सर्वपक्षीय नेत्यांवर जनतेतून टीकेची झोड उठविली जात आहे. त्यामुळे विकासाच्या गाजरावर जनतेचा लवकर विश्वास बसायला तयार नसून ‘लबाड लांडग ढोंग करतय’ अन् निवडणूक आली म्हणून विकास कामाचे सोंग करतय? अशी टीकाच आता सर्वपक्षीय उमेदवारांवर मतदारांतून केली जात आहे.