श्रीरामपूर | गेल्या अनेक दिवसांपासून दत्तनगर आणि आगाशे नगर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला अखेर यश आले आहे. बुधवारी (दि. २४) पहाटेच्या सुमारास हा बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. यामुळे संपूर्ण परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला असून भीतीचे सावट दूर झाले आहे. झाडीचा घेतला होता आश्रय नेवासा–संगमनेर रस्त्यालगत असलेल्या आगाशे नगर येथील पाण्याच्या तळ्या जवळील दाट निलगिरीच्या झाडीत बिबट्याने आपला मुक्काम ठोकला होता. सायंकाळच्या वेळी रस्ता ओलांडताना अनेक नागरिकांनी त्याला प्रत्यक्ष पाहिले होते, तर काही ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्येही बिबट्याच्या हालचाली टिपल्या गेल्या होत्या. यामुळे या परिसरात सायंकाळनंतर घराबाहेर पडणे कठीण झाले होते. लोकप्रतिनिधी अन् प्रशासनाचा पाठपुरावा नागरिकांच्या वाढत्या तक्रारींनंतर वनविभाग व दत्तनगर ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने हालचाली केल्या. यामध्ये सरपंच सारिका कुंकूलोळ, बाबासाहेब दिघे, नानासाहेब शिंदे, प्रेमचंद कुंकूलोळ, किरण खंडागळे, सुरेश शिवलकर, शहाजान बागवान आणि ग्रामविकास अधिकारी रुबाब पटेल यांनी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर नगराध्यक्ष करण ससाणे व विलास पुंड यांच्या शेतात वनविभागाने पिंजरा लावला. पहाटे पडला पिंजऱ्यात पिंजऱ्यात भक्ष म्हणून शेतकरी संजय तुपे यांनी शेळीचे करडू ठेवले होते. बुधवारी पहाटे भक्षाच्या शोधात आलेला बिबट्या पिंजऱ्यात अडकला. ही बाब लक्षात येताच तुपे यांनी तत्काळ वनरक्षक अक्षय बडे यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. प्राणीमित्र मंजाबापू खेमनर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेरबंद झालेला बिबट्या अंदाजे तीन वर्षे वयाची मादी आहे. पोलीस बंदोबस्त अन् ग्रामस्थांचे सहकार्य बिबट्या पकडला गेल्याची बातमी पसरताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. या मोहिमेत वनरक्षक अक्षय बडे, विलास डगळे, राहुल कानडे, बंडू खेमनर यांच्यासह सुनील शिरसाठ, संजय जगताप, विशाल पठारे, संदीप मगर आणि स्थानिक तरुणांचे मोलाचे सहकार्य लाभले. वेळेत उपाययोजना केल्यामुळे संभाव्य अनर्थ टळला असून, दत्तनगर परिसर आता सुरक्षित झाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.