प्रभात वृत्तसेवा शेवगाव – शेवगाव नगरपरिषदेला स्वतंत्र प्रशासकीय इमारत नसल्याने सध्या नगरपरिषदेचे कामकाज शहरातील पैठण रस्त्यावरील क्रीडा संकुलामध्ये सुरू आहे. हे ठिकाण शहरापासून दूर असल्याने नागरिक, अधिकारी व कर्मचारी यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने शहरात भव्य व सुसज्ज प्रशासकीय इमारतीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा. अशी मागणी आमदार मोनिका राजळे यांनी हिवाळी अधिवेशनात केली आहे .शेवगाव नगरपरिषदेचे प्रशासन अत्यंत अपुऱ्या सुविधांमध्ये सुरू असून, क्रीडा संकुलातील २० बाय १५ च्या एका हॉलमध्ये सर्व विभागप्रमुखांना काम करावे लागत आहे. तसेच दोन १० बाय १० च्या खोल्यांमध्ये मुख्याधिकाऱ्यांचे कार्यालय चालते. नगरपरिषद कार्यालयासाठी स्वतंत्र सभागृह नाही. तसेच नगराध्यक्ष, उपाध्यक्ष यासह सभापती व मुख्याधिकारी यांच्यासाठीही स्वतंत्र केबिनची सुविधा उपलब्ध नाही. नगरपरिषद प्रशासकीय इमारत नसल्यामुळे नागरिकांना कोणत्या कामासाठी कुठे जावे, याबाबत संभ्रम निर्माण होतो. त्याचा परिणाम दैनंदिन कामकाजावर होत आहे. शेवगाव शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता स्वतंत्र, सुरक्षित व सुसज्ज प्रशासकीय इमारत अत्यावश्यक आहे. त्यामुळे शासनाने विशेष बाब म्हणून निधी मंजूर करावा, अशी ठाम भूमिका आमदार राजळे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे मांडली आहे .