नेवासा- अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी नेवासा विशेष जिल्हा न्यायालयाने वरखेड येथील देवा उर्फ देविदास शेषराव उर्फ शशिकांत कुंढारे (वय २३) या आरोपीस २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. १८ ऑक्टोबर २०२१ रोजी अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली होती. आरोपी कुंढारे याने तिला फूस लावून पळवून नेले आणि ती अल्पवयीन (वय १५ वर्षांपेक्षा कमी) असल्याची माहिती असूनही लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध सावेडी परिसरात लैंगिक अत्याचार केला, अशी माहिती समोर आली. नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर निरीक्षक समाधान भाटेवाल आणि नंतर पो.नि. बाजीराव पोवार यांनी तपास केला व दोषारोपत्र न्यायालयात दाखल केले. या खटल्यात अतिरिक्त सरकारी अभियोक्ता देवा काळे व विष्णुदास भोर्डे यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडली. सरकारी पक्षाने सादर केलेले तोंडी आणि लेखी पुरावे ग्राह्य धरून, विशेष जिल्हा न्यायाधीश आर. आर. हस्तेकर यांनी आरोपीस पोक्सो नुसार २० वर्षे तुरुंगवास आणि दोन वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली आहे.