प्रभात वृत्तसेवा संगमनेर – तालुक्यातील जवळे कडलग येथील चार वर्षांचा चिमुकला सिद्धेश सूरज कडलग याचा बिबट्याच्या हल्ल्यात झालेल्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण परिसर सुन्न झाला होता. या हृदयद्रावक घटनेनंतर गावासह परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. अखेर या घटनेला कारणीभूत ठरलेला बिबट्याला वनविभागाच्या पथकाने जेरबंद केले आहे. घटनेनंतर वनविभागाने तत्काळ हालचाली करत परिसरात पिंजरे लावले. ड्रोन व पथकांच्या सहाय्याने सतत गस्त घालून शोधमोहीम तीव्र केली होती. रविवारी पहाटे बिबट्याचा ठाव लागल्यानंतर वनविभागाच्या तज्ज्ञ पथकाने नियोजनबद्ध कारवाई केली. दुपारी बारा ते एक वाजेच्या सुमारास बिबट्याला गुंगीचे औषध देऊन सुरक्षितरीत्या जेरबंद करण्यात आले. गुंगीचा प्रभाव पडताच बिबट्या बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्यानंतर कोणतीही जीवितहानी न होता त्याला ताब्यात घेण्यात आले. या यशस्वी कारवाईमुळे गेल्या काही दिवसांपासून दहशतीत असलेल्या ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. या कारवाईनंतर गावकऱ्यांनी वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. मात्र, चिमुकल्या सिद्धेशच्या दुर्दैवी मृत्यूने कडलग कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलेला असून, या घटनेने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.