प्रभात वृत्तसेवा संगमनेर – तालुक्यातील जवळे कडलग येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या सिद्धेश कडलग या बालकाच्या कुटुंबियांची प्रस्तुती अत्यंत नाजूक आहे. त्यामुळे राज्य शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, तसेच कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरीत समावेश होण्याबाबत विचार व्हावा तसेच त्या मयत बालकाचे आधार कार्ड नसल्या मुळे त्याच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी अडचण येऊ नये. अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन माध्य मातून नागपूर विधिमंडळात मांडून सरकारचे लक्ष वेधले.बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी जवळे कडलग येथील कडलग वस्तीवर चार वर्षाचा सिद्धेश सूरज कडलग घराजवळ खेळत असताना गिन्नी गवतात दबा धरून बसलेल्या नरभक्षक बिबट्याने त्याच्यावर अचानक जीवघेणा हल्ला केला. बिबट्याच्या दातांनी गळा व डोक्यावर गंभीर जखमा झाल्याने सिद्धेशचा जागीच मृत्यू झाला. सिद्धेशचे कुटुंब शेती व दुग्ध व्यवसायावर आपला उदरनिर्वाह करत असून, घटनेच्या वेळी कुटुंबातील सदस्य शेतात पाणी भरण्याच्या कामात व्यस्त होते. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण जवळे कडलग परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार अमोल खताळ यांनी वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी करून बिबट्यांना जेरबंद करत मानवी वस्तीतून दूर ठेवावे, तसेच नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे तत्काळ आदेश द्यावेत, अशी मागणी विधिमंडळात करत त्या नरभक्षक बिबट्यावर कारवाईसाठी आदेश दिल्याबद्दल वनमंत्री गणेश नाईक, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्याचे वनाधिकारी विवेक खांडेकर व एम. एस. रेड्डी यांचे आभार मानले.