नेवासा : (राजेंद्र वाघमारे) – आजच्या कलियुगात राजकारणात पक्षांतर आणि विश्वासघाताची रोज नवी उदाहरणे समोर येत असताना, जिल्ह्यात मात्र एका नेत्याचे कार्यकर्ते आजही खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे आहेत. ते म्हणजे राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील! जिल्ह्यातील उत्तर ते दक्षिण असे अनेक कार्यकर्ते आज वेगवेगळ्या पक्षांत असले तरी त्यांचे मन एकच – “विंखेसाहेबांचेच!” विरोधकांनी कितीही शक्ती लावली, कितीही युक्त्या लढवल्या तरी “लय मजबूत विखेंचा किल्ला” अजूनही कोसो मैल दूर आहे, हे जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात वेळोवेळी सिद्ध झाले आहे. जिल्ह्यात अनेक दिग्गज नेत्यांना त्यांच्याच जवळच्या कार्यकर्त्यांनी ऐन निवडणुकीत दगा देऊन धूळ चारली आहे. पण विखे पाटलांच्या बाबतीत अशी एकही घटना घडलेली नाही. कारण विखे पाटील काम झाले की कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडत नाहीत. उलट उत्तर जिल्ह्यातील असो की दक्षिणेतील, प्रत्येक निष्ठावान कार्यकर्त्याला सतत ताकद, साथ आणि राजकीय रसद पुरवतात. “काम झाले अन् झोकून दिले” ही इतर नेत्यांची पद्धत असली तरी विखे पाटील यांची मात्र वेगळी आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते पक्ष कोणताही असो, खुलेआम म्हणतात, “आमचे तर खरे पक्ष विखे पाटीलच आहेत!” हेच कारण आहे की जिल्ह्यात आजही विखे पाटील हे निर्विवाद किंगमेकर आहेत. त्यांच्या एका इशाऱ्यावर कार्यकर्ते जीवाचं रान करतात आणि निवडणुकीत चमत्कार घडवतात. जिल्ह्यातील राजकीय जाणकार म्हणतात, “विंखेमुळे कार्यकर्त्यांना आपला नेता खंबीरपणे साथ देतो याची खात्री आहे. त्यामुळेच ते कधीही दगा करत नाहीत. उलट इतर नेत्यांचे कार्यकर्ते ऐनवेळी शेरास सव्वाशेर होऊन पडद्याआडून दुसऱ्याला बळ देताना दिसतात.” विंखे पाटलांचा हा एकनिष्ठ कार्यकर्त्यांचा बालेकिल्ला पाहून विरोधकही आता हतबल झाले आहेत. कारण जिल्ह्याच्या राजकीय पटलावर “विंखे फॅक्टर” हा सतत वाढतच आहे. विरोधकांची कितीही ताकद असली तरी विखे पाटलांच्या निष्ठावान फौजेसमोर ती तोकडी पडते आहे, ही वस्तुस्थिती आता कोणीही नाकारू शकत नाही. जिल्ह्याच्या राजकारणात “विंखेंचा किल्ला” अजूनही अजिंक्य आहे, आणि तोपर्यंत राधाकृष्ण विखे पाटील हे जिल्ह्याचे खरे गॉडफादर राहणार, हे निश्चित!