नेवासे : नेवासे-शेवगाव राज्यमार्गावरील भानसहिवरे शिवारात शनिवारी (दि. १०) सकाळी सुमारे ८.४५ वाजता भीषण अपघात घडला. एका दूध डेअरीजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या राजेंद्र गंगाधर भोईटे (वय ५२, रा. भानसहिवरे, ता. नेवासे) यांना भरधाव वेगातील डंपरने जोराची धडक दिली. या अपघातात भोईटे यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. धडक दिल्यानंतर डंपर चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. मात्र, थोड्याच अंतरावर जाऊन सदर डंपर पलटी झाला. त्यानंतर काही अज्ञात व्यक्तींनी जेसीबीच्या मदतीने डंपर पुन्हा उभा करून तो घटनास्थळावरून झटपट पसार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अपघातानंतर गंभीर जखमी अवस्थेत राजेंद्र भोईटे यांना तातडीने नेवासे फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. ही माहिती मिळताच मृतकाच्या नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला. अपघातातील डंपर आणि चालकाला तात्काळ अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा ठाम इशारा नातेवाईकांनी दिला. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर सायंकाळी ३ वाजेपर्यंतही आरोपी चालक आणि डंपर पोलिसांच्या ताब्यात न आल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली. मृतकाच्या नातेवाईक व पोलिसांमध्ये यावेळी जोरदार खडाजंगी झाल्याचे चित्र दिसून आले. अखेर दुपारी ४ वाजल्यानंतर पोलिसांनी डंपरचा छडा लावत चालकासह वाहन ताब्यात घेतले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेऊन शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार केले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. नागरिकांमध्ये तीव्र संताप मृतक राजेंद्र भोईटे हे शनिशिंगणापूर येथे दर्शन घेऊन परतत असताना भानसहिवरे शिवारात फोन आल्याने त्यांनी रस्त्याच्या कडेला दुचाकी थांबवली होती. याच वेळी विरोधी दिशेने भरधाव आलेल्या डंपरने त्यांना जोराची धडक दिली. अपघातानंतर डंपर पलटी झाला असतानाही तो जेसीबीच्या सहाय्याने सरळ करून पसार करण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.