तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमानाला अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाल्यानंतर गेल्या काही दिवसांच्या कालावधीमध्ये राजकारणात बर्यापैकी उलथापालथ झाली असली तरी या अपघातानंतर जे विविध प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत, त्यांना वेळीच उत्तरे दिली नाहीत तर या निमित्ताने निर्माण झालेले संशयाचे धुके अधिकच गडद होणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा संशय फक्त विमान अपघाताबाबत नाही तर अजितदादांच्या (Ajit Pawar) मृत्यूनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाबाबत जी सातत्याने चर्चा सुरू झाली आहे त्यावरूनही राजकीय संभ्रमाचे वातावरण आहे. साहजिकच विमानाच्या अपघाताबाबत जे काही संशय व्यक्त करण्यात येत आहेत त्याचे उत्तर विमान अपघाताची चौकशी पूर्ण केल्यानंतर समोर येईलच. पण सध्या विनाकारणच अनेक जण ज्या विविध प्रकारच्या थियरीज मांडत आहेत त्या वेळीच खोडून काढण्याचे काम सरकारी पातळीवर होणेही तेवढेच आवश्यक आहे. दुसरीकडे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या विलीनीकरणाबाबतही सातत्याने चर्चा होत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी खुलासे केले असले तरी ही चर्चा थांबायला तयार नाही. या दोन्ही विषयांबाबत सरकारी पातळीवर आणि पक्षीय पातळीवरसुद्धा वेळीच खुलासे झाले नाहीत तर विनाकारणच राज्यामध्ये संशयाचे आणि संभ्रमाचे वातावरण कायम राहणार आहे. अजितदादा यांच्या विमानाला अपघात झाला होता, असेच प्रथमदर्शनी स्पष्टपणे दिसत आहे. पण गेल्या काही वर्षांमध्ये अशा प्रकारचा कोणताही अपघात झाला तर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला घातपाताचे स्वरूप देण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जातो. Ajit Pawar यावेळीसुद्धा तशाच प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. शरद पवार यांनी स्वतः यामध्ये घातपात असण्याचे कोणतेही कारण दिसत नाही, असे स्पष्ट करूनही ही चर्चा थांबायला तयार नाही. सोशल मीडियावरील तथाकथित गुप्तहेर आणि हौशी तपासतज्ज्ञ याबाबत विविध प्रकारच्या थियरीज मांडत आहेत. राज्यात संशयाचे वातावरण निर्माण करणे हेच त्यामागील उद्दिष्ट दिसते. मुख्य म्हणजे काही राजकीय नेतेसुद्धा या संशयामध्ये भर घालण्याचे काम करत आहेत ही जास्त चुकीची गोष्ट आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे तथाकथित विलीनीकरण आणि विमानाला झालेला अपघात यांची विनाकारण जोडणी करण्याचे प्रयत्नही होत आहेत. 12 फेब्रुवारीला विलीनीकरणाची घोषणा होणार होती अशी माहिती सातत्याने शरद पवार गटातील प्रमुख नेत्यांकडून दिली जात आहे. पण हे विलीनीकरण झाल्यावर एकत्रित गट सरकारमध्ये राहणार होता की सरकारमधून बाहेर पडणार होता या प्रश्नाला कोणीही उत्तर देताना दिसत नाही. शरद पवार गटातील भाजपचे जे कट्टर विरोधीनेते आहेत त्यांना विलीनीकरण मान्य असेल का या प्रश्नाचे उत्तरही दिले जात नाही. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांमध्ये आम्ही एनडीएचे म्हणजेच भाजप आघाडीचे घटक पक्ष आहोत आणि यापुढेही तसेच राहू असे सांगितले आहे. तरीही ही विलीनीकरणाची चर्चा जाणीवपूर्वक सुरू ठेवण्यात येत आहे. याबाबत अजितदादांनी कोणतीही कल्पना दिली नव्हती असा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे आणि त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनीसुद्धा तशाच प्रकारची माहिती दिली. एवढा महत्त्वाचा विषय अजितदादांनी आमच्यापासून लपवून ठेवला नसता हाच त्यांचा दावा आहे. असे असूनसुद्धा कोणत्यातरी विशिष्ट कारणाने ही विलीनीकरणाची चर्चा सुरू ठेवली जात आहे. एकूण राजकीय परिस्थितीचा विचार करता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार बहुमतात असतानासुद्धा त्यांनी आपल्या सरकारमध्ये अजित पवार यांच्या गटाला सामील करून घेतले होते. विधानसभा निवडणुकीनंतर भाजपचे बळ वाढले असल्याने त्यांना सत्ता टिकवण्यासाठी खूपच कमी पाठिंब्याची गरज आहे. असे राजकीय वास्तव असताना विलीनीकरणाची चर्चा सुरू ठेवून अजित पवारांच्या नेतृत्वाखालील पक्षामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा उद्देश यामागे दिसतो. खरेतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आणि आपला कार्यभार स्वीकारल्यानंतर विलीनीकरणाच्या चर्चेला कोणताच अर्थ राहत नाही.तरीसुद्धा गेल्या दहा-बारा दिवसांच्या कालावधीमध्ये विमान अपघाताबाबत संशय आणि विलीनीकरणाबाबत चर्चा सातत्याने जाणीवपूर्वक सुरू ठेवून संशयाचे आणि संभ्रमाचे वातावरण तयार करण्यात येत आहे. सरकारने विमान अपघाताबाबत संशय दूर करण्याची जबाबदारी स्वीकारायला हवी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विलीनीकरणाच्या चर्चेला कायमस्वरूपी पूर्णविराम द्यायला हवा तरच राज्यातील हे संशयाचे आणि संभ्रमाचे वातावरणही संपेल.