Donald Trump : अमेरिकेच्या अध्यक्षांची उपस्थिती असलेल्या कार्यक्रमात गोळीबाराची घटना घडली. जगभरातून याबाबत चिंता व्यक्त झाली. डोनाल्ड ट्रम्प यांना लक्ष्य करण्याचाच खरा हेतू होता की ट्रम्प (Donald Trump) यांच्याकडून जी धोरणे राबवली जात आहेत त्याचा निषेध नोंदवण्याचा हा टोकाचा प्रयत्न होता यावर चर्चा होईलच. ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरण्याचा इरादा जाहीर केल्यापासून कालच्या डिनर पार्टीतील गोळीबाराची घटना घडेपर्यंत त्यांच्यावर किंवा त्यांच्या दिशेने चार वेळा गोळीबार झाला आहे. एकदा तर गोळी त्यांच्या कानाला चाटून गेली. ट्रम्प यांचे अमेरिकेसह जगभरात हजारो विरोधक आणि लाखो अथवा कोट्यवधी टीकाकार असले तरी विरोधाचा हा प्रकार निषेधार्ह आहे. तथापि, एवढा विरोध आपल्याला का होतो आहे याचा विचार आता खुद्द ट्रम्प यांना तारतम्य ठेवून करावा लागणार आहे. तसा ते करतील का यातच त्यांचे राजकीय भविष्य असणार आहे. विविध देशांतील नेत्यांनी गोळीबाराचा निषेध केला. विरोधकाला तर्कशुद्ध मांडणीने निरूत्तर करायचे असते. त्याचा दृष्टिकोन कसा चुकीचा आहे हे कटुता न येता त्याला पटवून द्यायचे असते. तसे न करता विरोधकाला थेट संपवण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा ती लोकशाही नसते. ट्रम्पनी त्यांच्या अहंकारी स्वभावामुळे आणि तर्कशून्य कोलांटउड्यांमुळे शत्रूंचीच जमवाजमव केली आहे. रशिया-युक्रेन युद्धात रशियाला ठोसपणे दटावण्याचे धाडस ते आजवर दाखवू शकले नाहीत. काही तासांत हे युद्ध संपवण्याच्या वल्गना त्यांनी केल्या होत्या. Donald Trump रशियाशी बोलणीचा फार्सही केला. काही कलमी कार्यक्रम तयार केला व तोच नंतर बासनात गुंडाळून ठेवला. आता युद्धाचाच त्यांना विसर पडला आहे. ग्रीनलँड ताब्यात घेण्याची डरकाळी त्यांनी फोडली, कॅनडाला अमेरिकेचे (Donald Trump) राज्य बनवण्याची उबळही ट्रम्प यांना आली होती. त्या त्या वेळी त्यांनी फोडलेल्या शाब्दिक फटाक्यांमुळे जगात अनिश्चततेचे वातावरण निर्माण झाले. शेअर बाजारांमध्ये पडझडी झाल्या आणि ट्रम्प मात्र ‘मैने ऐसा तो नहीं कहाँ था’ या अविर्भावात सोईस्करपणे सर्व विसरले. टेरिफचे शस्त्र काढून त्यांनी व्यापार युद्ध सुरू केले. अनेक विकसनशील अथवा मध्यम देशांना त्यांनी त्यांच्या लहरी निर्णयामुळे तडाखा दिला. या देशांवर मोठा आयातकर लावला. अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टानेच त्यांना दट्ट्या लावल्यामुळे आता वसूल केलेली जादा रक्कम संबंधित देशांना वा कंपन्यांना परत देण्याची नामुष्की त्यांच्यावर आली. मात्र या कशाचेच त्यांना काही सोयरसूतक नाही. टेरिफ अथवा अन्य वादग्रस्त निर्णयाची घोषणा करणारी व्यक्ती वेगळीच कोणी आहे व मी मात्र वेगळा आहे असे ते भासवत असतात. इस्रायलसोबत इराणच्या विरोधात संघर्ष सुरू करून त्यांनी जगाला गॅसवर नेले आहे. गॅससाठी लोकांचे हाल आणि इंधनाच्या पुरवठ्याबाबत अनिश्चितता आहे. या कशाचा त्यांना पश्चाताप नाही, उलट त्यांची आतषबाजीच सुरू आहे. चर्चा करायची की नाही यावरच जेवढा गोंधळ घालता येईल तेवढा त्यांच्याकडून घातला जातो आहे. त्यांच्यावरच्या कालच्या गोळीबाराला ही सगळी पार्श्वभूमी आहे. आत्मपरीक्षण करण्याऐवजी त्यांनी अमेरिकेचे प्रसिद्ध माजी अध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्याशीच स्वत:ची तुलना करून आपलीच पाठ थोपटून घेतली. जगात जो प्रभावशाली असतो त्यालाच म्हणे लक्ष्य केले जाते आणि मला याचा अभिमान आहे, अशी टिमकी त्यांनी वाजवली. ‘लिंकन जसे महान होते तसाच मीही महान आहे’ असे ते सांगून गेले. तसेच ‘मी देशात काही मोठे बदल केल्यामुळे अनेक लोक नाखूश आहेत. हल्ले झाले तरी मी खचून जाणार नाही’ अशी टिप्पणी करायला ते विसरले नाही. व्हाइट हाउसच्या पत्रकारांसाठी आयोजित केलेल्या पार्टीत गोळीबार झाला हा गंभीर आणि मुख्य विषय आहे. त्याला ट्रम्प यांचा आजवरचा प्रवास आणि बोलघेवडेपणा कारणीभूत आहेच, मात्र सुरक्षेच्या उणिवांकडेही लक्ष देण्याची गरज आहे. सुरक्षा असणे म्हणजे सुरक्षित असणे हा समज चुकीचा असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. त्याचे कारण सुरक्षा वाचवू शकत नसल्याची असंख्य उदाहरणे आहेत. अगदी लिंकन आणि जॉन केनेडीही वाचू शकले नव्हते. पृथ्वीवरच्या अन्य देशांच्या तुलनेत अमेरिका श्रीमंत आहे यामुळे त्या देशाला प्रतिष्ठा आहे. त्याचवेळी तुलनात्मकदृष्ट्या हा देश अधिक सुरक्षित आहे म्हणूनही त्याला प्रतिष्ठा आहे. देशाच्या सुरक्षेसाठी पाण्यासारखा पैसा खर्च करणारा हा देश. असे असूनही जर अध्यक्षांवरच गोळीबार होत असेल तर अमेरिकेने आणि तिच्या अध्यक्षांनी यातून बोध घेण्याची हीच योग्य वेळ. गोळीबार झाला तेव्हा केवळ ट्रम्प एकटे नव्हते. त्यांचे उपाध्यक्ष, संरक्षण मंत्री, परराष्ट्र व्यवहार मंत्री असे त्या देशाचे सगळेच महामानव तेथे उपस्थित होते. मोठे नामांकित पत्रकारही होते. तरीही एक व्यक्ती सुरक्षा तपासणीचे सर्व अडथळे पार करत व्हाइट हाउसच्या कार्यक्रमात बंदूक घेऊन पाहोचतो आणि गोळी झाडतो. तुम्ही हल्ल्यातून जेव्हा बचावतात तेव्हा ते सुदैव असते. प्रत्येक वेळा तुम्ही सुदैवी ठरू शकत नाही. सुरक्षा यंत्रणेनेच नाही तर खुद्द ट्रम्प यांनीही आता अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. केवळ गोळीबार अथवा अन्य हल्ल्यापासून बचावाचीच नाही तर आपण अमेरिका म्हणून जे काही बोलत आहोत अथवा करत आहोत त्याबाबतही त्यांनी काळजी करावी असे या घटनेतून त्यांना सूचित होते आहे. हा असंतोष आहे, त्याची दखल ट्रम्प यांना घ्यावीच लागेल.