गुवाहाटी : प्रसिद्ध गायक झुबीन गर्ग यांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी बुधवारी ‘नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हल’चे आयोजक श्यामकानू महंता आणि झुबीनचा मॅनेजर सिद्धार्थ शर्मा यांना अटक केली. या दोघांना न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. सिंगापूरमध्ये स्कुबा डाइव्हिंगदरम्यान 19 सप्टेंबर रोजी झुबीनचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांच्या मृत्यूबाबत विविध शंका उपस्थित केल्या जात आहेत. सिंगापूरमध्ये आयोजित केलेल्या नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलमध्ये परफॉर्म करण्यासाठी ते तिथे गेले होते. आयोजक श्यामकानू महंता यांना सिंगापूरमधूनच ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर त्यांना आधी दिल्लीत आणले गेले आणि नंतर कडक सुरक्षेत गुवाहाटीला नेण्यात आले. तर झुबीनचा सहाय्यक आणि मॅनेजर सिद्धार्थ शर्माला गुरुग्राममधील फ्लॅटमधून अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली. गेल्या आठवड्यात इंटरपोलमार्फत दोघांविरुद्ध लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली होती. श्यामकानू आणि सिद्धार्थ यांनी 6 ऑक्टोबर रोजी गुवाहाटी येथे चौकशी पथकासमोर त्यांचे जबाब नोंदवण्यासाठी हजर राहावे, असे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले होते. दरम्यान झुबीनच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी आसाम सरकारने विशेष डीजीपी एमपी गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली 10 सदस्यीय विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. या तपासादरम्यान एसआयटीने सिद्धार्थच्या गुवाहाटी इथल्या घरावर छापा टाकला होता. त्यात त्यांनी अनेक कागदपत्रे जप्त केली होती.