“झेडपी’च्या एकमेव सर्वसाधारण गटामध्ये कमालीची चुरस वाढणार

वडगाव मावळ – आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी मावळातील गटांसाठी नुकतेच आरक्षण सोडत जाहीर झाली असून त्यात मावळातील जिल्हा परिषदेच्या एकूण 6 गटांपैकी केवळ 1 गटात सर्वसाधारण आरक्षण आल्याने या टाकवे बु.- नाणे गटात कोणत्या उमेदवाराची वर्णी लागणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
मावळात या पंचवार्षिक निवडणुकीत पंचायत समिती सदस्यांपेक्षा जिल्हा परिषद सदस्य होण्यासाठी जास्त इच्छुक आहेत. अशा अनेक इच्छुकांनी पक्षाकडून आपले तिकीट पक्के व्हावे यासाठी मागील वर्षे भरापासून तयारी सुरू केली होती. पण ऐनवेळी मावळात जिल्हा परिषदेचा एक गट व पंचायत समितीचे दोन गण वाढल्याने गट आणि गणांची रचना बदलल्याने अनेक इच्छूक थंडावले होते. मात्र तरी देखील त्यांनी आशा सोडली नव्हती. पण आरक्षण सोडतीनंतर अनेक इच्छूकांच्या पदरी निराशा आली आहे.
नवीन इच्छुक उमेदवरांप्रमाणे माजी जिल्हा परिषद सदस्यदेखील आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण मावळातील जिल्हा परिषदेच्या एकूण 6 गटांपैकी केवळ एकच जागेवर सर्वसाधारण आरक्षण आल्याने आता नक्की उमेदवारी कोणास द्यावी हे देखील राजकीय पक्ष श्रेष्ठींसमोर आव्हान असणार आहे.
सद्या मावळात राष्ट्रवादीचे वारे वाहत असल्याने भाजप आणि इतर पक्षांच्या इच्छुकांपेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे इच्छुक अधिक उत्साही असल्याचे पहायला मिळत आहे. परंतु राज्यात भाजपची सत्ता आल्याने भाजप मध्ये देखील इच्छुकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. परंतु मावळ भाजपच्या गोटात सद्या तरी शांतता दिसत आहे.
मागील वर्षे भरापासून राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अनेक इच्छूक तसेच दोन्ही पक्षातले माजी जिल्हा परिषद सदस्य देखील आता सर्वसाधारण आरक्षण आलेल्या टाकवे- नाणे गटातून उमेदवारी मागण्याची दाट शक्यता आहे. यामुळे मागील अनेक दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी तयारी करत असलेले इच्छुक राष्ट्रवादी कडून तिकीट न मिळाल्यास आता भाजप मधून किंवा अपक्ष लढले तरी आश्चर्य वाटायला नको. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवणुकीसाठी भाजप मधून इच्छुकांचे चेहरे अद्याप पर्यंत पुढे आले नसल्याने या निवडणुकीत उमेदवारांची जुळवा जुळव करताना भाजपची दमछाक होऊ शकते असे चित्र सद्या तरी निर्माण झाले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचा चांगला प्रभाव
जिल्हा परिषदेच्या टाकवे नाणे गट हा आंदर मावळ व नाणे मावळ या दोन्ही भागांना जोडणारा गट आहे.तसेच या भागात पूर्वीपासूनच राष्ट्रवादी कॉंग्रेसचा चांगला प्रभाव आहे. तालुक्यात या एकाच गटास सर्वसाधारण आरक्षण आल्याने या गटात अनेक अपक्ष उमेदवार देखील उभे राहू शकतात. त्यामुळे चुरस निर्माण होऊन ही निवडणुक प्रतिष्ठेची होणार आहे.





