Satara: झेडपी अध्यक्ष कुणबी दाखला प्रकरण; चौकशीसाठी दक्षता समितीकडे वर्ग
Satara डॉ. प्रिया शिंदे यांनी दिलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करुन संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जयदीप मगर व खटाव पंचायत समितीचे माजी उपसभापती संतोष साळुंखे यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे केली होती.

Satara: जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डौ. सौ. प्रिया शिंदे यांच्या कुणबी दाखल्याबाबत तक्रार करणाऱ्या संतोष साळुंखे व जयदीप मगर यांच्यावतीने जात पडताळणी समितीसमोर मंगळवारी लेखी म्हणणे व पुरावे सादर करण्यात आले. समितीने हे प्रकरण आता चौकशीसाठी दक्षता समितीकडे वर्ग केले आहे.
डॉ. प्रिया शिंदे यांनी दिलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करुन संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जयदीप मगर व खटाव पंचायत समितीचे माजी उपसभापती संतोष साळुंखे यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे केली होती. मागील सुनावणीत संतोष साळुंखे व जयदीप मगर यांची मागणी मान्य करत तक्रारदारांना मुळ संचिकेची प्रत देत देण्याच्या सूचना केल्या होत्या. तक्रारदारांनी तक्रारीच्या अनुषंगाने लेखी म्हणणे व यासंदर्भात पुरावे सादर करण्याबाबत तक्रारदारांना आदेश दिले होते. याबाबत जात पडताळणी समितीसमोर मंगळवारी सुनावणी झाली.
यावेळी तक्रारदारांच्यावतीने ॲड. दत्तात्रय घोडके यांनी लेखी म्हणणे व पुरावे सादर केले. डॉ. प्रिया शिंदे यांच्या निवडीने साळुंखे व मगर यांचे कोणतेही राजकीय नुकसान झाले नाही. त्यामुळे त्यांना याबाबत तक्रार करण्याचा अधिकारी नाही, असा युक्तीवाद प्रिया शिंदे यांचे वकील ॲड. पिसाळ व पाटील यांनी केला. ही तक्रार रद्द करावी अशी मागणी त्यांनी केली. साळुंखे व मगर यांच्यावतीने ॲड. दत्तात्रय घोडके म्हणाले, ‘तक्रार रद्द करणे योग्य होणार नसून ते नियमाला, कायद्याला धरुन होणार नाही. तक्रारदारांच्या अधिकारांवर गदा आणण्यापेक्षा त्यांनी सादर केलेल्या पुराव्यांची पडताळणी करावी.’ त्यानुसार समितीने तक्रारदारांनी सादर केलेले लेखी म्हणणे व पुराव्यांची चौकशी करण्यासाठी हे प्रकरण दक्षता समितीकडे वर्ग केले आहे.





