प्रभात वृत्तसेवा सासवड – पुरंदर तालुक्यात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. (दि.५) फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून (दि.१६) पासून उमेदवारी अर्जांची विक्री सुरू होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील इच्छुक उमेदवारांची कागदपत्रांची जुळवाजुळव, पक्षांकडून एबी फॉर्म मिळवण्याची धडपड आणि संघटन बांधणीला जोर आला आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांकडून विविध सामाजिक-सांस्कृतिक उपक्रम राबवले जात आहेत. महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम, साडी वाटप, युवकांसाठी क्रिकेट सामने, बैलगाडा शर्यती, देवदर्शन व यात्रांचे आयोजन करून प्रचाराची नवी शैली अवलंबली जात आहे. प्रचार गाठीभेटी, मतदार संपर्क आणि स्थानिक प्रश्नांवर भर देत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यंदाच्या निवडणुकीत पुरंदर तालुक्यातून ८ पंचायत समिती सदस्य व ४ जिल्हा परिषद सदस्य निवडले जाणार आहेत. पंचायत समितीच्या सभापतीपदाची सोडत आधीच जाहीर झाली असून हे पद ओबीसी आरक्षणासाठी राखीव आहे. त्यामुळे ओबीसी प्रवर्गातील इच्छुकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. काही गणांमध्ये ओबीसी आरक्षण लागू झाल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. दरम्यान, तालुक्यातील मोठ्या राजकीय घडामोडींमुळेही निवडणुकीला वेगळे वळण मिळाले आहे. माजी आमदार संजय जगताप यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजपाची ताकद वाढली तरी त्यांचे स्वतंत्र राजकीय अस्तित्व टिकवणे हे आव्हान ठरणार आहे. दुसरीकडे, पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांना सासवड, जेजुरी उरुळी देवाची या नगरपरिषदांच्या निवडणुकीत काहीअंशी अपयश आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत अस्तित्व सिद्ध करण्यासाठी मोठी ताकद पणाला लावावी लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.जिल्हा परिषद क्षेत्रीय समीकरणे पाहता, बेलसर–माळशिरस गटावर अनेक वर्षे माजी सदस्य सुदामराव इंगळे यांचे वर्चस्व राहिले आहे. या मतदारसंघातील काही गावे विमानतळ प्रकल्पात गेल्याने आरक्षण बदलून हा गट सर्वसाधारण झाला आहे. त्यामुळे येथे चुरशीची रस्सीखेच पाहायला मिळत आहे. या गटात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून गौरव कोलते, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून ह.भ.प. अमोल कामठे, दत्ता झुरंगे यांची जोरदार तयारी सुरू आहे. आगामी काळात दोन्ही राष्ट्रवादी गटांमध्ये काय समीकरण तयार होते, यावर उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. दिवे- गराडे गटात माजी मंत्री दादासाहेब जाधवराव यांचा प्रभाव दीर्घकाळ राहिला आहे. मात्र, विमानतळ प्रकल्पामुळे होणाऱ्याभूसंपादनामुळे काही गावांमध्ये मतदार असंतोष वाढण्याची शक्यता आहे. याचा फायदा कोणाला होणार, हे निकालातून स्पष्ट होईल. या गटात पंचायत समितीसाठी राष्ट्रवादीचे अमित झेंडे यांनी तयारीला गती दिली आहे. एकूणच, विमानतळ प्रकल्प, स्थानिक विकास प्रश्न, महिलांचे आरक्षण, ओबीसी प्रतिनिधित्व आणि पक्षांतराच्या राजकारणामुळे पुरंदर तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक चुरशीची व निर्णायक ठरणार असल्याचे स्पष्ट होत आहे.