प्रभात वृत्तसेवा कळस – येथील जीवन प्राधिकरणाच्या पाणी योजनेचे काम दीर्घकाळापासून अर्धवट राहिल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या निष्क्रीयतेविरोधात येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा ग्रामपंचायतचे उपसरपंच विशाल राजेभोसले यांनी दिला आहे. राजेभोसले यांनी सांगितले की, पाणी योजनेअंतर्गत करण्यात आलेली अनेक कामे निकृष्ट दर्जाची असून महत्त्वाची कामे अपूर्ण अवस्थेत सोडण्यात आली आहेत. कळस, गोसावीवाडी, पिलेवाडी, बिरंगुडी या र्वच ठिकाणी कामे अपुरी असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मोठा निधी मंजूर होऊनही ठेकेदार व प्रशासनाची उदासीनता दिसत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी पुढे सांगितले की, वाढीव इस्टिमेट करूनदेखील कामे प्रलंबित आहेत. जलवाहिनीचे खोदकाम अनेक ठिकाणी कमी-जास्त करून करण्यात आल्याने पाणीपुरवठा योजनेची गुणवत्ता धोक्यात आली आहे. तपासणी अधिकार्यांकडूनही योग्य देखरेखीचा अभाव जाणवत असल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. काहीतरी गौडबंगाल कळस गावातील या योजनेसाठी तब्बल 32 कोटींचा निधी मंजूर होऊनही कामे मार्गी न लागल्याने संपूर्ण प्रक्रियेबद्दल संशय व्यक्त होत असून, ‘यात काहीतरी गौडबंगाल आहे’ अशी चर्चा गावात सुरू आहे. संबंधित अधिकार्यांकडे माहिती विचारली असता ते उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. ग्रामस्थांच्या रोषामुळे आगामी निवडणुकांमध्ये मतदानावर बहिष्काराचा इशारा गंभीर ठरण्याची शक्यता असून, प्रशासनाकडून तातडीने हस्तक्षेपाची मागणी होत आहे.