प्रभात वृत्तसेवा कापूरहोळ – जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीची उत्सुकता शिगेला पोहोचली असून इच्छुक उमेदवारांनी जोरदार प्रचार करत मोर्चे बांधणी केली आहे. परंतु पक्षाचे तिकीट मिळण्याची खात्री नसल्याने उमेदवार धास्तावलेले आहेत. वरिष्ठ पातळीवरील नेत्यांच्या सतत बदलत्या विचारधारेमुळे प्रत्येक कार्यकर्ता संभ्रमात पडला आहे.राजकीय पक्षांची मूळ विचारधारा जवळ, जवळ संपुष्टात आली आहे. पक्षांच्या वेळोवेळी बदलत्या भूमीका ही पक्षाची विचारधारा संपवत आहेत. सत्तेच्या खुर्चीसाटी कोणत्याही पातळीवर जावून सत्ता मिळवण या उद्देशाने राजकीय पक्ष भारावले आहेत. धनशक्तीच्या वाढत्या प्रकोपामुळे मत विकत घेण्यामागे पक्षांचा कल वाढल्याने आर्थिकदृष्ट्या कमकुवत कार्यकर्ते लोकशाहीच्या प्रवाहातून बाहेर पडण्याच्या वाटेवर आहेत. पक्षाच्या सत्ता मिळवण्याच्या हव्यासापोटी पैशाच्या बळावर आकस्मित पुढे येणारे उमेदवार आर्थिक तसेच विविध प्रलोभने दाखवून मतदारांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरताना दिसत आहेत. उमेदवारी देताना पक्षश्रेष्ठी पैसा किती खर्च करणार याचे आर्थिक आराखडे बांधत असल्याने पक्षाचा आर्थिकदृष्ट्या कमकुवत मूळ कार्यकर्ता मागे पडू लागला आहे. त्यामुळे लोकशाही ही भांडवल वादाकडे झुकत आहे. धनदांडग्यांनी उमेदवारीसाठी दंड थोपटले असून मतदारांना साडी वाटप, तिर्थयात्रा,निसर्ग पर्यटन आणि मतदानाआधी या ना त्या मार्गाने रोख रक्कम पुरवून मतदान जवळजवळ खरेदी करण्याचा सपाटा लावला आहे. लोकशाही टिकवण्याची जबाबदारी आता खऱ्या अर्थाने मतदारांवर येवून ठेपली आहे. निवडणुकीतील भांडवल वाद संपवण्यासाठी मतदारांनी खरा जनतेचा सेवक कोण याची पारख करून सदसद्विवेक बुध्दीने मतदान करणे गरजेचे आहे. आर्थिक लोभाला बळी पडून मतदान केल्यास निवडून आलेले भांडवलवादी उमेदवार लोकशाहीचा गळा घोटून भांडवलशाहीकडे झुकतील आणी केलेला खर्च दुपटीने वसूल करण्यासाठी भ्रष्टाचाराला खतपाणी घालतील यात शंकाच नाही. “विकावू व लाभार्थी मतदारांची संख्याही नगण्य आहे. हेच लोक या नेत्यांच्या मागेपुढे फिरत असतात यांच्याच रिल काढून आपली स्वतःची प्रसिध्दी मिळवण्यासाठी टिमकी वाजवत आहेत. आता तरी मतदारांनी जागे व्हावे, योग्य प्रतिनिधी निवडा.” – योगेश गाडे पाटील, मतदार