प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर ( शेरखान शेख ) – शिक्रापूर जिल्हा परिषद गट आगामी निवडणुकीमुळे पुन्हा एकदा राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीमुळे या गटात राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यात लढत निश्चित झाली असताना, यात भाजप डाव टाकणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही लढत माजी आमदार अशोक पवार आणि स्थानिक अजित पवार गटाचे नेते यांची कसोटी पाहणारी ठरणार आहे. अजित पवार गटात दावेदारी.. शिक्रापूर गटाच्या विद्यमान सदस्य कुसुम मांढरे यांनी राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आमदार अशोक पवारांवरील नाराजीनंतर अजित पवार गटात राहणे पसंत केले आहे. त्या पुन्हा एकदा प्रबळ दावेदार असून, त्यांच्याकडे दांडगा जनसंपर्क आणि कोविड काळातील कामाचा अनुभव आहे. त्यांच्यासोबत शिरूर पंचायत समितीच्या माजी सभापती मोनिका हरगुडे यांनीही उमेदवारीसाठी तयारी सुरू केली आहे. हरगुडे यांच्याकडे प्रशासकीय अनुभव असल्याने, एकाच गटातून दोन अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि वजनदार महिला नेत्यांची दावेदारी उमेदवारीसाठी असणार आहे. शरद पवार गट आणि भाजपची भूमिका.. शरद पवार गटासाठी ही निष्ठा सिद्ध करण्याची संधी असून, माजी आमदार अशोक पवार कुठल्या महिला उमेदवाराला उमेदवारी देतात? याकडे लक्ष लागले आहे. माजी सरपंच आबासाहेब करंजे यांच्या कुटुंबातील महिला किंवा माजी जिल्हा परिषद सदस्य रोहिणी सासवडे यांची नावे चर्चेत आहेत. दरम्यान, त्रिकोणी लढत झाल्यास भारतीय जनता पक्षाकडून अनपेक्षित आणि धक्कादायक चेहरा समोर आणण्याची शक्यता आहे. भाजप प्रमुख लढतीत नसला तरी, त्यांचे उमेदवार दोन्ही पवार गटाच्या मतांचे विभाजन करण्यास कारणीभूत ठरू शकतात. स्थानिक पातळीवर भाजपचा प्रभाव असलेले मतदार निर्णायक क्षणी कोणाला मदत करतात, यावर गटाचा निकाल अवलंबून आहे. मतदार विभागाचे बदलते स्वरूप.. या गटात औद्योगिक आणि शेतीप्रधान मतदारांचे मिश्रण आहे. सणसवाडी, शिक्रापूर आणि कोरेगाव भीमा यांसारख्या औद्योगिक भागातील मतदार विकास, रोजगार आणि स्थानिक नेतृत्वाच्या ठोस कामावर भर देण्याची शक्यता आहे, तर कासारी गावासारख्या शेतीप्रधान भागातील मतदारांची भूमिका देखील निर्णयक ठरणार आहे. चुरशीची लढत आणि टर्निंग पॉईंट.. शिक्रापूर गटातील लढत अत्यंत चुरशीची आणि अनिश्चित असणार आहे. अजित पवार गटाचा उमेदवार हा येथील निवडणुकीचा सर्वात महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरणार आहे. औद्योगिक आणि कृषी क्षेत्रातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी दोन्ही गटांना विकासाचे आणि भावनिक दोन्ही मुद्दे एकाच वेळी वापरावे लागणार आहेत.