Zojila Tunnel : झोजिला खिंड 32 दिवसांत पुन्हा सुरू; बॉर्डर रोड ऑर्गनायजेशनची विक्रमी कामगिरी

नवी दिल्ली : बर्फवृष्टीमुळे गेले 32 दिवस वाहतुकीसाठी बंद असलेली झोजिला ही खिंड सीमा रस्ता संघटना अर्थात बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (बीआरओ) ने आज विक्रमी वेळेत खुली केली. लेफ्टनंट जनरल रघु श्रीनिवासन यांनी लडाखकडे जाणाऱ्या पहिल्या काफिल्याला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. झोजिला पास ही काश्मीर खोऱ्याला लडाखशी जोडणारी खिंड जगातील सर्वात कठीण आणि आव्हानात्मक उंचीवरील खिंडींपैकी एक आहे.
या वर्षी २७ फेब्रुवारी ते १६ मार्च या कालावधीत झालेल्या अविरत हिमपातामुळे या खिंडीत मोठ्या प्रमाणात बर्फ साचले होते. शून्यापेक्षा कमी तापमान, उच्च वेगाचे वारे आणि हिमस्खलन होण्याची शक्यता असलेल्या भूप्रदेशात आत्यंतिक परिस्थितीशी झुंज देत बीआरओच्या कर्मचाऱ्यांनी १७ मार्च ते ३० मार्च या १४ दिवसांच्या विक्रमी कालावधीत बर्फ साफ केला.
दरवर्षी या दुर्गम खिंडीत प्रचंड हिमपात होतो, ज्यामुळे कडक हिवाळ्याच्या महिन्यांमध्ये ती बंद करावी लागते. या तात्पुरत्या बंदमुळे केवळ सैन्य आणि आवश्यक वस्तूंच्या वाहतुकीवरच परिणाम होत नाही तर लडाखमधील स्थानिक लोकसंख्येच्या दैनंदिन जीवनातही व्यत्यय येतो, जे व्यापार, वैद्यकीय मदत आणि आर्थिक क्रियाकलापांसाठी या मार्गावर अवलंबून असतात.


