IND vs ZIM T20I Series 2024 : टी20 मालिकेसाठी झिम्बाब्वेचा संघ जाहीर, इतर देशाच्या एका खेळाडूचाही समावेश…

Zimbabwe Squad For India T20I Series : टी-20 विश्वचषक 2024 च्या स्पर्धेत विजेतेपद मिळवल्यानंतर भारतीय संघाचा पुढील दौरा झिम्बाब्वेचा आहे. भारतीय संघ झिम्बाब्वेविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. यासाठी दोन्ही संघांनी आपापल्या संघांची घोषणा केली असून यामध्ये झिम्बाब्वे संघातील एका खेळाडूची जोरदार चर्चा होत आहे. हा झिम्बाब्वेचा नसून दुसऱ्या देशाचा आहे. अंतुम नकवी (Antum Naqvi) असे त्या खेळाडूचे नाव आहे.
कोण आहे अंतुम नकवी?
या संघातील सर्वात आश्चर्यकारक निवड निश्चितच अंतुम नक्वीची आहे. हा 25 वर्षीय फलंदाज उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. या वर्षाच्या सुरुवातीला झिम्बाब्वेकडून खेळताना त्याने पहिले त्रिशतक झळकावण्याचा पराक्रम केला होता.
अंतुम नक्वी याचा जन्म ब्रुसेल्स, बेल्जियम येथे पाकिस्तानी पालकांमध्ये झाला. नंतर ते ऑस्ट्रेलियाला गेले. पण त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झिम्बाब्वेचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा व्यक्त केली आणि नागरिकत्वासाठी अर्ज केला. त्यानंतरच त्याला संघात सामील होण्याची संधी मिळाली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मिड वेस्ट राइनोजकडून खेळणाऱ्या नक्वीचा टी-20 फॉरमॅटमध्ये 146.80 असा उत्कृष्ट स्ट्राइक रेट आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याची सरासरी 72.00 आणि लिस्ट ए क्रिकेटमध्ये 73.42 इतकी आहे. अंतुम नक्वी मिड वेस्ट राइनोजचा कर्णधार देखील आहे.
सामन्याचे वेळापत्रक
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाच सामन्यांच्या आंतरराष्ट्रीय T20 मालिकेतील पहिला सामना 6 जुलै रोजी होणार आहे. दुसरा T20 सामना 7 जुलै, तिसरा 10 जुलै, चौथा 13 जुलै आणि पाचवा 14 जुलै रोजी खेळवला जाईल. हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी साडेचार वाजता सुरू होतील आणि झिम्बाब्वेची राजधानी हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळले जातील. या सामन्याचे प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स चॅनलवर केले जाणार आहे.
झिम्बाब्वे संघ – रझा सिकंदर (कर्णधार), अक्रम फराज, बेनेट ब्रायन, कॅम्पबेल जोनाथन, चतारा तेंडाई, जोंगवे ल्यूक, काइया इनोसंट, माडेन्डे क्लाइव्ह, मधवेरे वेस्ली, मारुमणी तादिवनाशे, मसाकादझा वेलिंग्टन, मावुता ब्रँडन, मुझाराबानी ब्लेसिंग, मायर्स डायन, नकवी अंतुम, नगारवा रिचर्ड, शुम्बा मिल्टन.

