जिल्हा परिषद शाळेचे ‘बीओटी’ मॉडेल राज्यभर राबविणार

शिर्डी – लोणी जिल्हा परिषद शाळेची बीओटी तत्त्वावर सुंदर इमारत उभारण्यात आली आहे. लोणी जिल्हा परिषद शाळेचे हे बीओटी मॉडेल राज्यभर राबविण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली. लोणी बुद्रुक येथे बीओटी तत्त्वावर बांधण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारतीचे व पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून बांधण्यात आलेल्या व्यापारी संकुल इमारत लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील होते. या वेळी खा. डॉ. सुजय विखे पाटील, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे-पाटील, जिल्हा सहकारी बॅंकेचे संचालक अण्णासाहेब म्हस्के-पाटील, उद्धव महाराज मंडलिक, जि. प. माजी अध्यक्षा शालिनीताई विखे-पाटील, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदी उपस्थित होते.
मंत्री केसरकर म्हणाले की, “परदेशासारखे शिक्षण ग्रामीण भागातील मुलांना मिळाले पाहिजे, यासाठी स्व. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील व स्व. पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे-पाटील यांनी सहकाराबरोबर शिक्षण क्षेत्रात काम केले. तंत्रज्ञानातील शिक्षण ग्रामीण भागातील मुलांना मिळण्यासाठी बाळासाहेब विखे पाटील यांनी राज्यातील पहिले खासगी आयटीआयची मुहूर्तमेढ लोणी येथे रोवली. यातून त्यांची दूरदृष्टी दिसून येते.”
विद्यार्थ्यांना शेतीचे ज्ञान व कौशल्य प्राप्त व्हावे. यासाठी पुढील शैक्षणिक वर्षापासून कृषी हा विषय इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यात येणार आहे. शालेय शिक्षणाचा पाया मजबूत करण्याचे काम जिल्हा परिषद शाळा करत असतात. लोणी येथे ‘बांधा,वापरा व हस्तांतरित करा’ (बीओटी) या तत्त्वावर बांधण्यात आलेली जिल्हा परिषद शाळा राज्यासाठी आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी या वेळी काढले.
मंत्री विखे-पाटील म्हणाले की, लोणी परिसरात आध्यात्मिक वारसा जोपासण्याचे काम पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी केले. सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचा 43वा स्मृतिदिन आणि लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांचा 91व्या जयंती दिनाचे औचित्य साधून लोणी बुद्रुक ग्रामस्थांतर्फे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता आणि अभिवादन सोहळा शालेय शिक्षमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत झाला. म्हस्के पाटील, खा. डॉ. विखे पाटील यांनीही मनोगत यावेळी व्यक्त केले.





