सातारा, (प्रतिनिधी)- नुकत्याच जाहीर झालेल्या जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेत कोरेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. अर्णव संतोष यादव, प्रार्थना नेताजी पाटील शाळा- सर्कलवाडी, शौर्या प्रशांत निकम शाळा-नांदवळ ,श्लोक सागर निकम शाळा- नायगाव ,मानवी नवनाथ वागडोळे शाळा -आर्वी ,स्वराली रमेश पाटील शाळा – भोसे असे 6 विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालयासाठी पात्र झाले आहेत . या शैक्षणिक वर्षात कोरेगाव तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तालुकास्तरीय विशेष मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात आला होता. या वर्गात तालुक्यातील शिष्यवृत्ती परिक्षेसाठी बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना तज्ञ शिक्षकांकडून मार्गदर्शन करण्यात येत होते. तज्ञांनी तयार केलेल्या प्रश्नपत्रिका वापरून अभिरुप सराव चाचण्या घेतल्या गेल्या.या सर्व विशेष मार्गदर्शनाचा लाभ विद्यार्थ्यांना नवोदय परिक्षेसाठी निश्चितपणे झाला असल्याचे शिक्षक व पालक वर्गातून सांगण्यात आले. अशा विशेष वर्गाचे आयोजन केल्याबद्दल शिक्षक ,पालक व विद्यार्थी यांनी गटशिक्षणाधिकारी धनंजय चोपडे ,शिक्षण विस्तार अधिकारी वनिता मोरे, मनीषा चंदुरे ,केंद्रप्रमुख सर्जेराव धनवडे, समग्र शिक्षा सर्व कर्मचारी वर्ग, मुख्याध्यापक, मार्गदर्शक शिक्षक यांचे आभार मानले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे धनंजय चोपडे, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख,समग्र शिक्षा कर्मचारी वर्ग, शाळा व्यवस्थापन समिती , मुख्याध्यापक आदींनी अभिनंदन केले.