नगर -लॉकडाऊनमुळे जिल्हा परिषदेच्या शाळांचे आगामी शैक्षणिक वर्षातील प्रवेश ऑनलाइन होणार आहेत. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांनी या वर्षातील शाळा प्रवेशाचे नियोजन सुरू केले असून, ऑनलाइन गुगल फॉर्म तयार केले आहेत.या फॉर्मद्वारे पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्यात येत आहे.
राज्यात दरवर्षी जून महिन्यात शाळा सुरू होतात.याआधी शाळांकडून नवीन प्रवेश, तसेच अन्य आवश्यक कार्यवाही करण्यात येते. यावेळी मात्र करोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन आहे. राज्यातील शाळा आणि कॉलेज बंद आहेत. शिक्षकसुद्धा शाळेत येत नाहीत. या काळात ‘स्टडी फ्रॉम होम’ पद्धतीने अभ्यास घेण्यात येत आहे. आता नवीन शैक्षणिक वर्षातील शाळा प्रवेशाचे नियोजनसुद्धा ऑनलाइन केले जात आहे. काही शाळांनी गुगल फॉर्म तयार केले आहेत. या फॉर्मद्वारे पालकांकडून माहिती मागवण्यात येत आहे. पालकसुद्धा फॉर्म भरून पाठवत आहेत. यामुळे शाळा प्रवेशासाठी पालकांना शाळेत येण्याची आवश्यकता राहणार नाही.
शाळांकडून अशा पद्धतीने माहिती संकलित करण्यात येत आहे. याबाबत शिक्षण विभागाने दिलेल्या सूचनांनुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.शाळास्तरावर नियोजन सुरु जिल्हा परिषदेच्या शाळांतील पटसंख्या वाढवण्यासाठी शाळांनी नियोजन करण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून नेहमीच देण्यात येतात. शाळांचा पट वाढणे महत्त्वाचे आहे. यासाठी शाळा त्यांच्या स्तरावर शाळा प्रवेशाचे नियोजन करतात.
याआधी मात्र शाळा प्रवेशाबाबत माहिती घेण्यासाठी गावात सर्वेक्षण केले जात होते. या वेळी असे सर्वेक्षण शक्य होणार नाही. हे लक्षात आल्यानंतर शाळांनी हा उपाय केला आहे. गुगल फॉर्म तयार करून त्याद्वारे माहिती मागवण्यात येत आहे.शाळांमधून आगामी शैक्षणिक वर्षातील प्रवेशाचे नियोजन केले आहे. इयत्ता पहिली प्रवेशासाठी ऑनलाईन गुगलफॉर्मद्वारे प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. या पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्याबाबत शाळांना सुचना देण्यात आल्या असून पालकांनी देखील शाळास्ततरावर मदत करावी.
रमाकांत काठमोरे, प्राथमिक शिक्षणाधिकारी