अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाने जिल्हा परिषद दणाणली

नगर  – अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या व केंद्र सरकारने जाहीर केलेली मानधन वाढ फरकासह मिळण्यासाठी अहमदनगर जिल्हा अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी युनियनच्या वतीने जिल्हा परिषदेत धरणे आंदोलन करण्यात आले. आश्‍वासन देऊन पूर्तता न करणाऱ्या सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त करुन, मानधन नको, वेतन देण्याच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाने जिल्हा परिषदेचा परिसर दणाणून निघाला.

या आंदोलनात सरचिटणीस कॉ.राजेंद्र बावके, मदिना शेख, जीवन सुरुडे, माया जाजू, रतन गोरे, नंदा पाचपुते, रजनी क्षीरसागर, वंदना गमे, संगीता इंगळे, अरुणा खळेकर, बेबी शिंदे, इंदूबाई दुशिंग, संगीता इंगळे, मंदा शर्मा, मीना धाकतोंडे, संगिता विश्‍वास आदिंसह जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली.

केंद्र सरकारने अंगणवाडी सेविकांसाठी जाहिर केलेली मानधन वाढ फरकासह त्वरित द्यावी, इतर राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांप्रमाणे समकक्ष मानधन द्यावे, मानधन ऐवजी वेतनश्रेणी मिळावी, सेवानिवृत्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे एक रकमी लाभाची प्रकरणे निकाली काढावे, मानधनाच्या प्रमाणात अर्धी पेन्शन द्यावी, टीएचआर बंद करुन सकस व पुरक आहार द्यावा, अंब्रेला योजनेतील सुधारित दर लागू करावा, मिनी अंगणवाडीचे नियमित अंगणवाडी केंद्रात रुपांतर करुन मदतनिसांची नेमणूक करावी व सेवेचे वेतन फायदे द्यावे, मिनी अंगणवाडी केंद्रांना प्रशासकीय खर्च 2 हजार रु. देण्याची मागणी करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.