पुणे जिल्हा | आमदारकीच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेची तयारी

वाघोली, (प्रतिनिधी) – शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रिंगणात इच्छुक उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली असली तरी या निवडणुकीच्या रिंगणात जिल्हा परिषद पंचायत समिती व पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमध्ये आगामी काळात निवडणुका होणार असल्याने या ठिकाणी इच्छुकांनी जोरदार प्रचार यंत्रणा राबवण्यास सुरुवात केली आहे.
ग्रामपंचायतच्या पदाधिकार्यांना महत्व
विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती व पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच सरपंच उपसरपंच पदाधिकारी यांना अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले असून इच्छुकांनी या वोटर बँकच्या प्रमुखांना भेटीगाठी करून आपल्याकडे वळवण्याकडे भर दिला आहे.
महिला पाठबळ आवश्यक
विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुकीच्या मधील महिला बचत गटांचे जाळे, महिला संस्था, महिलांसाठी विविध कार्यक्रम राबवून महिलांचे पाठबळ मिळवण्यासाठी इच्छुकांनी महिला संघटन मजबूत करण्याकडे भर दिला असल्याची दिसून येत आहे.
सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींना महत्त्व
सेवा सहकारी संस्था, सहकारी गृहनिर्माण संस्था तसेच इतर सामाजिक बांधिलकी जोपासणार्या संस्थांच्या सदस्य व त्यांच्या कार्यकारी मंडळ यांचा पाठिंबा आगामी निवडणुकीत व्हावा यासाठी इच्छुकांनी या संस्थांच्या कार्यक्रमांना हजेरी लावत प्रचार दिमाखात सुरू केला आहे.
इच्छुकांची संख्या वाढली
विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अनेकांनी आपले नशीब आजमावण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात दावेदारी प्रबळ करण्यासाठी विविध पक्ष संघटना यांच्या प्रतिनिधींनी निवडणुकीमध्ये रंगत निर्माण करत प्रचार यंत्रणा हातात घेतल्यामुळे इच्छुकांची संख्या वाढू लागली आहे.
नेत्यांनी गावाकडे लक्ष देण्याचा कल वाढला
अमुक गाव अमुक नेत्याचे, तमुगाव तमुक नेत्याचे म्हणून तालुक्यात प्रचलित आहे या गावातील मतदारांवर आपला प्रभाव राहावा व आपल्या अस्तित्व कायम ठेवण्यासाठी नेते मंडळींनी गाव सांभाळून प्रचार यंत्रणा वेगात पुढे आणली आहे.
लोकसंख्येने जास्त असणार्या गावांकडे नेते मंडळींचे लक्ष असून या गावांवर वर्चस्व आणि मतदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी धडपड सुरू केली आहे.
जनसंपर्क, नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक, लोकाभिमुख निर्णय, जनतेची लोकप्रियता या बाबी इच्छुक उमेदवारांना निवडणुकीत मतदारांच्या पाठिंब्याने पडताळता येतात. जनसंपर्काची संधी कोणताही इच्छुक उमेदवार सोडू शकत नाही.
लोकशाही मजबूत करण्यासाठी हाच जनसंपर्क विश्वासाचे प्रतीक बनतो. म्हणूनच इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. -रामभाऊ दाभाडे, माजी सदस्य, जिल्हा परिषद पुणे





