अनेक सदस्य व त्यांचे नातेवाईक झाले आमदार;काहींचे अजूनही प्रयत्न सुरुच
नगर – जिल्ह्यातील विधानसभेच्या बारा गावच्या बारा रंगांच्या अन बारा ढंगांच्या बारा लढती ठरल्या.प्रत्येक लढतीचे वैशिष्ठये व खासियत वेगळी होती. अनेक प्रस्थापितांना हादरे देणाऱ्या या निकालाचे आणखी एक वैशिष्ठये म्हणजे यातील अनेक विजयी व प्रमुख पराभूत उमेदवारांचा मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेशी संबंध आलेला आहे. यातून अनेकांचा विधानसभेच्या आमदारकीचा रस्ता हा जिल्हा परिषदेतून जात असल्याचे दिसून येते.
अकोले मतदारसंघातून आमदार झालेले डॉ.किरण लहामटे हे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य असून त्यांचे वडील यमाजी लहामटे दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य होते.लहामटे यांनी पराभूत केलेले आमदार वैभव पिचड हे पण जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीचे सभापती होते.पिचड यांचे वडिल माजी मंत्री मधुकर पिचड हे पण पंचायत समितीत सभापती होते.त्यातून ते पुढे आमदार व मंत्री झाले. शिर्डीचे भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे यांचे वडील कै.बाळासाहेब विखे हे जिल्हा पारिषदेत उपाध्यक्ष होते.पुढे ते खासदार व केंद्रीय मंत्री झाले. त्यांच्या सुनबाई शालिनीताई या सध्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आहेत.
कोपरगावमधील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिलेले कै.शंकरराव काळे आमदार,मंत्री व खासदार झाले. त्यांचे सुपुत्र अशोक काळे हे पुढे आमदार झाले.त्यानंतर आता त्यांचे नातू आशुतोष काळे हे आमदार झाले आहेत. ते जिल्हा परिषदेच्या विद्यमान उपाध्यक्षा राजश्रीताई घुले यांचे जावाई आहेत. काळेंकडून अगदी थोड्या मतांनी पराभूत झालेल्या आमदार स्नेहलता कोल्हे यांचे सासरे माजी मंत्री शंकरराव कोल्हे हे पंचायत समितीचे माजी सभापती होते. त्यातूनच ते आमदार व मंत्री झाले. कोपरगावमधून अपक्ष उमेदवारी केलेले राजेश परजणे जिल्हा परिषद सदस्य असून ते अध्यक्षा शालिनीताई यांचे बंधू आहेत.
नेवासामधून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिलेले यशंवतराव गडाख खासदार झाले.आता त्यांचे चिरंजीव शंकरराव गडाख परत आमदार झाले आहेत.त्यांच्या पत्नी सुनिताताई पंचायत समितीच्या माजी सभापती आहेत.येथे पराभूत झालेले आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या पत्नी आशाताई जिल्हा परिषद सदस्या होत्या. नेवाशा-शेवगावमधून यापूर्वी आमदार झालेले नरेंद्र घुले जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते.
पाथर्डी-शेवगावच्या आमदार मोनिकाताई राजळे या जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा होत्या.त्यांचे सासरे अप्पासाहेब राजळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. पराभूत राष्ट्रवादीचे उमेदवार प्रताप ढाकणे यांच्या पत्नी प्रभावती ढाकणे जिल्हा परिषद सदस्या आहेत.त्यांनीही विधानसभेचा अर्ज भरला होता.याच गटातून दुसऱ्या जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांनीही अर्ज दाखल केला होता.
पारनेरमधून आमदार झालेले राष्ट्रवादीचे निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके ह्या शिवसेनेच्या जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्या आहेत.
तर त्यांनी ज्यांना पराभूत केले ते विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी स्वतः जिल्हा परिषद सदस्य असताना त्यानंतर तीन वेळा आमदार झाले.औटी यांच्या पत्नी जयश्रीताई जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समितीच्या सभापती होत्या.जिल्हा परिषदेच्या सदस्या सुप्रियाताई झावरे यांचे चिरंजीव व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजीत झावरे यांना पहिल्या अपयशानंतर परत आमदारकी लढवयाची होती.त्यांचे वडिल कै.वंसतराव झावरे हे जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समितीचे सभापती होते.त्यातून पुढे ते दहा वर्ष आमदार राहिले. दुसरे जिल्हा परिषद संदेश कार्ले हेही पारनेरमधून सेनेकडून इच्छुक होते. नगर शहराचा जिल्हा परिषदेशी संबंध येत नसला तरी येथील आमदार संग्राम जगताप यांचे बंधू सचीन व आता वहिनी सुर्वणा श्रीगोंदा तालुक्यातून जिल्हा परिषद सदस्या आहेत.
श्रीगोंद्याचे आमदार झालेले माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभाताई मागील वेळी जिल्हा परिषद सदस्या होत्या. विधानसभेसाठी अर्ज दाखल केलेल्या अनुराधा नागवडे ह्या जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती आहेत.मागील पंचवार्षिकला आमदार राहिलेले आमदार राहुल जगताप हे पण जिल्हा परिषदेचे सदस्य होते. कर्जत-जामखेडमधून पालकमंत्री राम शिंदे यांना हरवून जायंट किलर झालेले रोहित पवार हेही पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. जिल्ह्यातील बहुतांशी मतदारसंघातील विजयी व पराभूत उमेदवारांचा हा जिल्हा परिषदेशी संबंध आलेला आहे.