प्रभात वृत्तसेवा रांजणी – आंबेगाव तालुक्यातील अत्यंत महत्वाचा समजला जाणारा कळंब-चांडोली जिल्हा परिषद गट महिला सर्वसाधारण घोषित झाल्यानंतर दोन्ही आघाड्यांमध्ये चुरशीची लढत रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून या गटातून तुलसी सचिन भोर संभाव्य उमेदवार म्हणून पुढे असून त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) प्रीती प्रवीण थोरात या महाविकास आघाडीत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवू शकतात, अशी विश्वसनीय माहिती आहे. त्यामुळे या गटात महाविकास आघाडीचा जोर वाढण्याची शक्यता राजकीय तज्ञांचा अंदाज आहे.या गटाचे महत्त्व अजित पवार गटासाठी विशेष आहे. एक वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांना या भागात दोन हजारांहून अधिक मते कमी मिळाली होती, तर विरोधी उमेदवार देवदत्त निकम (महाविकास आघाडी – शरद पवार गट) यांना आघाडी मिळाली होती. त्यामुळे या वेळी होणारी जिल्हा परिषद निवडणूक अजित पवार गटासाठी प्रतिष्ठेची बनली आहे.सन 2017 मध्ये तुलसी भोर यांच्या विरोधात तत्कालीन शिवसेना उमेदवार प्रिती थोरात यांनी कडवी लढत दिली होती. मात्र त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध असल्याने तुलसी भोर विजयी झाल्या. तथापि पक्षात फूट पडल्याने मतांची विभागणी निर्माण झाली आहे.प्रीती थोरात या शिंदे गटातील मजबूत कार्यकर्त्या असून शिंदे शिवसेना, उबाठा गट आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) या तीनही प्रवाहांचा या भागात प्रभाव आहे. महाविकास आघाडी विरुद्ध अजित पवार गट? आंबेगाव तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी (शरद पवार गट), शिवसेना (शिंदे), काँग्रेस, भाजप हे सर्व पक्ष एकत्र लढत असल्याची चिन्हे आहेत. तर अजित पवार गट एकटाच मैदानात उतरण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांच्या ताकदीची कसोटी या भागात लागणार आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार तालुक्यात वरिष्ठ पातळीवर गुप्त बैठका वेगाने सुरू असून व्यापक आघाडीचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात आहे.