यवतमाळ – स्मशानभूमीच्या सुशोभिकरणासाठी मंजूर निधीच्या देयकाची प्रक्रिया पूर्ण करून प्रमाणपत्रावर स्वाक्षरी मिळवण्यासाठी १० हजारांची लाच घेताना जिल्हा परिषदेच्या बांधकाम उप अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. आर्णी येथील शासकीय कार्यालयात बुधवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या उप अभियंत्याचे नाव संतोष भगवानराव क्षिरसागर (वय ५३) असून, ते जिल्हा परिषद, यवतमाळच्या बांधकाम उपविभाग, आर्णी येथे कार्यरत आहेत. त्यांच्यासह त्यांचा खाजगी चालक सागर शंकरराव भारती (वय २७) यालाही लाच घेताना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी तक्रारदार सरपंच यांनी आपल्या गावातील स्मशानभूमी सुशोभिकरणाचे काम पूर्ण केल्यानंतर त्याचे देयक काढण्यासाठी उप अभियंत्याची भेट घेतली होती. मात्र क्षिरसागर यांनी एकूण १० लाखांच्या मंजूर रकमेच्या २ टक्के रक्कम म्हणजेच २० हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने तत्काळ १४ जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. यावरून विभागाने १५ जुलै रोजी लाचेच्या मागणीची पडताळणी केली. तडजोडीनंतर १० हजार रुपयांवर सहमती झाली. त्यानुसार १६ जुलै रोजी आर्णी येथील शासकीय कार्यालयात सापळा रचण्यात आला. लाच रक्कम उप अभियंत्याच्या सूचनेनुसार चालक सागर भारती याने स्वीकारताच दोघांनाही रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक मनोज ओरके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.