satara | जिल्हा बॅंक महिलांना उघडून देणार झिरो बॅलन्स खाते

सातारा, (प्रतिनिधी)- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत महिलांकरीता ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अनुषंगाने ‘झिरो बॅलन्स’ (शून्य बाकी) खाती तात्काळ उघडून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी दिली.
राज्य सरकारने विवाहिता,
विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५० लाख रुपयांपेक्षा जास्त नाही अशा महिलांकरीता ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजना शासनामार्फत सुरु केली आहे.
या योजनेच्या कालावधीदरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण बँक खात्यात दरमहा रुपये १५०० रुपये इतकी रक्कम देण्यात येणार आहे.
या योजनेमध्ये राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील महिला पात्र राहतील. यासाठी लाभार्थी राज्यातील रहिवासी लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ जिल्हयातील सर्व पात्र महिलांना मिळण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने या महिलांची ‘झिरो बॅलन्स्’ (शून्य बाकी) खाती बँकेच्या सर्व शाखांमध्ये तात्काळ उघडून घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
हे खाते उघडण्यासाठी महिलांचे खाते उघडण्याचा फॉर्म, २ फोटो, आधार कार्डची प्रत आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. जिल्हयातील बँकेच्या ३०७ शाखा व १२ विस्तारीत कक्षांद्वारे ग्राहकांची सेवा बँक करीत आहे.
या योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांनी घेणेसाठी ‘झिरो बॅलन्स्’ (शुन्य बाकी) खाती आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करुन उघडून घेण्यासाठी बँकेच्या नजिकच्या शाखेमध्ये संपर्क साधावा, असे आवाहन अध्यक्ष नितीन पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी केले.
बँकेच्या कामकाजासाठी आ .रामराजे नाईक निंबाळकर, आ. बाळासाहेब पाटील, आ. शिवेंद्रसिहराजे भोसले, खा. उदयनराजे भोसले, आ. मकरंद पाटील यांचे मार्गदर्शन लाभते, असे त्यांनी सांगितले. बँकेच्या सर्व ठेवींवरील व्याजदर अत्यंत आकर्षक असून पाच लाख रुपयांपर्यंतच्या सर्व ठेवींना विमा संरक्षण आहे.
बँकेने कर्ज वसुलीचे कामकाज सातत्याने प्रभावशाली केल्याने गेली १७ वर्षे बँकेच्या निव्वळ अनुत्पादक कर्जाचे (एनपीए) प्रमाण शून्य टक्के राखले आहे,
बँकेने ग्राहकांना सर्वात कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले आहे. जिल्हयाच्या सर्वांगीण विकासासाठी बँकेने ठेवी व कर्जाच्या अनेकविध योजना आखल्या असून त्यास जिल्हयातून चांगला प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती श्री. पाटील यांनी दिली.





