Pimpri : शिरवली येथे शून्य कचरा व्यवस्थापन कार्यशाळा

खालापूर : ग्रुप ग्रामपंचायत शिरवली येथे माझी वसुंधरा अभियान ५.० व स्वच्छ भारत मिशन अभियान अंतर्गत शून्य कचरा व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेस आसरा फाउंडेशन संस्थापक, यशादा ट्रेनर अर्चना मोरे यांनी मार्गदर्शन केले. घरातील कचऱ्याची आपण कशा पद्धतीने विल्हेवाट लावून त्यापासून खत निर्मिती करू शकतो याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. तसेच घरातील कचऱ्याचा पुनर्वापर करणे याबाबत माहिती दिली गेली.
यावेळी सरपंच महेश पाटील, उपसरपंच गीता बांदल, ग्राम पंचायत सदस्य संदीप मोरे, रंजना मरगले, करुणा जाधव, ग्रामसेवक प्रल्हाद पाटील व शिरवली ग्रामपंचायत हद्दीतील महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. गावातील कचरा शुन्य करण्यासाठी स्वतः प्रत्येक घर पुढाकार घेईल आणि एक दिवस शिरवली हे शून्य कचरा गाव होईल याचा संकल्प सरपंच व उपस्थित महिला ग्रामस्थांनी यावेळी केला.
शून्य कचरा ही संकल्पना जोपर्यंत शासकीय स्तरावर अधिकारी वर्ग त्यांच्या घरामध्ये आणि त्यांच्या कार्यालयात राबवित नाहीत, तोपर्यंत गावातील नागरिकांमध्ये कचरा संस्कार रूजणार नाही, असे अर्चना मोरे यांनी सांगितले. गावातील प्रत्येक घरातील ओला, सुका व घनकचऱ्याची विभागणी करून ओल्या कचऱ्यावर कल्चर टाकून खत तयार करणे, सुका कचरा टाकून खत तयार करणे, सुका कचरा वेगळा ठेवून प्रक्रियेला देणे व प्लास्टिक वेगळे करून विक्रीसाठी उपलब्ध ठेवून आर्थिक उन्नती करणे, याचे प्रात्यक्षिकासह सादरीकरण केले.
कचरा उघड्यावर टाकल्याने त्यापासून होणारे दुष्परिणाम व प्लास्टिकचे पदार्थ खाल्ल्याने कॅन्सर व इतर आजार होण्याची शक्यता असते. त्यासाठी आजची कार्यशाळा महत्त्वाची ठरणार आहे, असे मत अर्चना मोरे यांनी व्यक्त केले.





