satara | शेतकऱ्यांना इथून पुढे शून्य वीजशुल्क

दहिवडी, (प्रतिनिधी) – पावसाळी अधिवेशनामध्ये महायुती सरकारकडून लागू करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी बांधवांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. त्यापैकी एक महत्वाचा निर्णय म्हणजे सात एचपीपर्यंतच्या शेतीपंपाना कोणत्याही प्रकारचे वीज शुल्क भरावे लागणार नाही. शेतकऱ्यांना इथून पुढचे वीज शुल्क हे पूर्णपणे शून्य असेल अशी महिती आमदार जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
यावेळी भाजपा मांडलाध्यक्ष शिवाजी शिंदे, गणेश सत्रे, सिद्धार्थ गुंडगे, विलासराव देशमुख व इतर भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. आमदार जयकुमार गोरे म्हणाले, या महत्वाच्या निर्णयबरोबरच एक रुपयामध्ये विमा योजना, प्रधान मंत्री किसान सन्मान योजना यांसारख्या शेतकरीराजाच्या जीवनातील अडचणी कमी करणाऱ्या अतिशय उपयुक्त अशा योजना आपल्या महायुती सरकारने अंमलात आणलेल्या आहेत. याबद्दल मीं सरकारचे आभार मानतो. माण तालुक्यात सध्या उरमोडीचे पाणी आले आहे,जिहे कटापुरचे पाणी पोहोचले आहे.
टेम्भूच्या कामाचे भूमिपूजन झाले आहे. त्याचबरोबर जसा पाऊस पडतोय तसे उत्तर माणकडील 32 गावांना पाणी पोहोचवण्याचे काम सुरू आहे. एका बाजूला शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवत असताना शेतकऱ्यांच्या आयुष्यात सुख-समृद्धी यावी म्हणून सरकारने शंभर टक्के लाईट बिल माफ करण्याची भूमिका घेतली आहे.
शेतीपंपाचे वीज बिल माफ करण्याबरोबरच शेतकऱ्यांना दिवसा वीज कशा प्रकारे देता येईल यासाठी सरकार कार्याशील आहे व येत्या दोन वर्षांमध्ये शेतकऱ्यांना दिवसा सुद्धा वीज पूर्णपणे मोफत दिली जाणार आहे.
माण खटाव विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचविण्यात जयकुमार कुठेही कमी पडणार नाही. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील पाणी पोहोचले आहे. ते येत्या पंधरा दिवसात प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचेल.
उरलेल्या जिहे कटापूरच्या 27 गावांची सुधारित मान्यता असेल औंधसह 20 गावांची मान्यता सरकार तातडीने करेल यामध्ये शंकाच नाही. कुकुडवाड, विरळी ते मांडवे पासून पेडगाव पर्यंतच्या टेंभू योजनेची सुप्रमा झाली टेंडर झाले व येत्या ऑगस्ट महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.
शेतकऱ्यांचे युवकांचे माता भगिनींचे आशीर्वाद कायमच आमच्या पाठीशी आहेत व ते असेच रावेत पाणी प्रश्नावरील ही शेवटची निवडणूक असेल इथून पुढे औद्योगिक मुद्द्यावरती निवडणूक होईल, अशी माहिती आमदार जयकुमार गोरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.





