मुंबईत काँग्रेसला पडणार खिंडार! झिशान सिद्दीकी हे अजित पवार गटाच्या वाटेवर

मुंबई – मुंबईत काँग्रेसला पुन्हा खिंडार पडण्याची शक्यता आहे. आमदार झिशान सिद्दीकी हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे आज मुंबईत अजित पवार यांच्या जनसंवाद यात्रेत झिशान सिद्दीकी सहभाही झाले. झिशान सिद्दीकी यांनी अजित पवार यांच्या कार्यक्रमापर्यंत बाईक रॅली काढली. तसेच ते जनसंवाद यात्रेच्या मंचावर गेले. झिशान सिद्दीकी यांच्या या भूमिकेमुळे आता काँग्रेसकडून त्यांच्यावर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
झिशान सिद्दीकी म्हणाले, आता जे काम होत आहे ते या सर्वांच्या मदतीने होत आहे. यापुढेही खूप काम करायची आहे. आपल्याला फक्त काम करायचे आहे. पण आपल्याला जो काम करण्यापासून रोखेल त्याला डोकं वर करुन उत्तर देणे देखील जाणतो. मला अनेक लोकं विचारत आहेत की, पुढे काय प्लॅन आहे. मी माझ्या माता, भगिनिंना विचारतो, जे काम आहे ते जनतेचं आहे, तुमचा आशीर्वाद माझ्या सोबत आहे तर माझ्या केसाला कुणी धक्का देखील लावू शकत नाही, असे झिशान सिद्दीकी म्हणाले.
इथे खूप अन्याय झाला आहे. पण प्रत्येक वेळी आम्ही काँटे की टक्कर दिली आहे. तुम्ही माझ्याजवळ येतात तेव्हा मी तुमच्यासाठी काम करतो. मी जेव्हा वरती जातो तेव्हा मला प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे आता बदलाची आवश्यकता आहे. आपल्याला न्याय देणे हे आमचे काम आहे. फक्त प्रेमाचं दुकान असून फायदा नाही तर मनामध्येही प्रेम असावे लागते, असा टोलाही त्यांनी लगाविला.





