Zareen Khan Mother Parveen Khan Death: बॉलिवूड अभिनेत्री झरीन खान (Zareen Khan) हिच्यासाठी बुधवारचा दिवस अत्यंत दुःखद ठरला. एका दिवसातच तिच्या आयुष्यात दोन मोठे धक्के बसले. आधी तिच्या पाळीव मांजरीचा मृत्यू झाला आणि काही तासांतच तिची आई परवीन खान यांचेही निधन झाले. या दुहेरी आघातामुळे तिच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परवीन खान गेल्या काही काळापासून आजारी होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, गेल्या काही दिवसांत त्यांची प्रकृती अधिक खालावली होती. अखेर ८ एप्रिल रोजी सकाळी मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कुटुंबीयांनी अधिकृत निवेदनाद्वारे त्यांच्या निधनाची माहिती दिल्यानंतर चित्रपटसृष्टीत आणि सोशल मीडियावर शोक व्यक्त करण्यात येत आहे. झरीन खानने विविध मुलाखतींमध्ये आणि सोशल मीडियावर तिने आईसोबतच्या नात्याबद्दल अनेकदा भावनिक उल्लेख केला होता. त्यामुळे या घटनेमुळे तिच्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, परवीन खान यांच्यावर ८ एप्रिल रोजी सकाळीच अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आणि काही चित्रपट क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होते. या घटनेला आणखी वेदनादायक बनवणारी बाब म्हणजे आईच्या निधनापूर्वी काही तास आधीच झरीन खानच्या पाळीव मांजरीचाही मृत्यू झाला होता. झरीनने उशिरा रात्री इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे ही माहिती शेअर करत आपल्या पाळीव प्राण्याला श्रद्धांजली वाहिली होती. ही मांजर त्यांच्या कुटुंबाचा एक भागच होती, त्यामुळे तिच्या मृत्यूनेही झरीनला मोठा धक्का बसला. सध्या झरीन खान अत्यंत भावनिक अवस्थेतून जात असल्याचे तिच्या जवळच्या व्यक्तींनी सांगितले. दरम्यान, सलमान खान (Salman Khan) सोबतच्या ‘वीर’ चित्रपटातून झरीन खानला बॉलिवूडमध्ये ओळख मिळाली होती. पहिल्याच चित्रपटानंतर तिला मोठी लोकप्रियता मिळाली होती. तिची तुलना अनेकदा कतरीना कैफ (Katrina Kaif) हिच्यासोबतही करण्यात आली होती. या दुःखद घटनेनंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून आणि चित्रपटसृष्टीतील व्यक्तींनी झरीन खानसाठी संवेदना व्यक्त केल्या असून, या कठीण काळात तिला धैर्य मिळावे अशी प्रार्थना करण्यात येत आहे.