प्रभात वृत्तसेवा नारायणगाव – जिल्हा परिषद निवडणुकीची अधिकृत घोषणा झालेली नसली तरी नारायणगाव-वारुळवाडी जिल्हा परिषद गटात इच्छुकांनी मतदारांच्या भेटीगाठी घेऊन प्रचारास सुरुवात केली आहे. काही उमेदवारांनी आपण केलेली विकासकामे आणि भविष्यातील योजनांची माहितीपत्रके छापून मतदारांपर्यंत पोहोचवणे सुरू केले आहे. या गटात आतापर्यंत एकाही राजकीय पक्षाने अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली नाही. परंतु, इच्छुक उमेदवारांच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर बैठका चालू आहेत.नारायणगाव – वारुळवाडी जिल्हा परिषद गटात नारायणगाव, वारूळवाडी, मांजरवाडी, गुंजाळवाडी, धनगरवाडी आणि हिवरे तर्फे नारायणगाव या गावांचा समावेश होतो. याशिवाय माळी समाज मोठा असल्याने त्याचा निवडणुकीवर मोठा परिणाम दिसून येतो. नारायणगाव-वारुळवाडी गटात शिवसेनेचे बाबुराव पाटे, मांजरवाडीत शिवसेना (उबाठा) गटाचे माऊली खंडागळे तर धनगरवाडीत प्रियंका शेळके यांची ताकद दिसून येते. बोरकर, खैरे, पाटे आदी जथे मोठे असल्याने ही निवडणूक अटीतटीची होऊ शकते. प्रत्येक गावात प्राबल्य असणारे स्थानिक राजकीय नेते इतर उमेदवारांना कशा पद्धतीने सहकार्य करतात, यावर निवडणुकीची गणिते अवलंबून आहेत. राजकीय पक्षांचे ठरेना… या गटातील निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. नेमकी राजकीय पक्षांची उमेदवारी कोणाला मिळते? यावर चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही राजकीय पक्षांची भूमिका स्पष्ट झालेली नाही. हे पक्ष घटक पक्षांबरोबर एकत्रित निवडणुका लढवणार की, एकमेकांना शह – काटशह देणार? हे येणारा काळ ठरवेल. जिल्हा परिषद निवडणुका स्थानिक कार्यकर्त्यांच्या असल्याने प्रत्यक्ष निवडणुका जाहीर झाल्यानंतर गट आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी तडजोडी झाल्या तर नवल वाटायला नको. इच्छुकांची मांदियाळी या गटात महायुतीतील शिवसेनेकडून नेहा पाटे, महाविकास आघाडीतील शिवसेना (उबाठा) गटाकडून रूपाली मेहेत्रे तर राष्ट्रवादीकडून प्रियंका शेळके, सुप्रिया खैरे, प्रियंका बोरकर इच्छुक असल्याची चर्चा चालू आहे. यातील काही इच्छुक उमेदवारांना अपेक्षेप्रमाणे उमेदवारी न मिळाल्यास राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षातून उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच काही उमेदवार आपापसात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी तडजोड करून वेगळा निर्णय घेऊ शकतात.