#YuvrajSingh : युवराजचा क्रिकेटला रामराम !

मुंबई – कर्करोगाच्या आजाराशी यशस्वी झुंज दिल्यानंतर पुन्हा क्रिकेट क्षेत्रात फिनिक्स प्रक्षाप्रमाणे भरारी घेणारा युवराजसिंग याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्षेत्रातून होण्याचा निर्णय घेतला आहे. येथे पत्रकार परिषदेत त्याने हा निर्णय जाहीर केला. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सहभागी होण्याबाबत प्रत्येकाच्या काही मर्यादा असतात त्यामुळेच मी अतिशय समाधानाने पूर्णविराम केला आहे असे युवराज याने यावेळी सांगितले.
युवराज याचे वडील योगराजसिंग हे आंतरराष्ट्रीय खेळाडू होते. त्यांच्याकडूनच युवराज याने क्रिकेटचे बाळकडू घेतले. याने इसवी सन 2000 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील सामन्यांमध्ये पर्दापण केले. त्याने 2017 पर्यंत स्थानिक स्पर्धांमध्ये पंजाबचे प्रतिविधित्व केले.
केनियाविरुध्दच्या सामन्याद्वारे त्याने इसवी सन 2000 मध्ये एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले. 16 ऑक्टोबर 2003 रोजी न्यूझीलंडविरुध्द त्याला कसोटी पर्दापणाची संधी मिळाली.युवराज सिंग याने भारतासाठी आपल्या कारकिर्दीत एकूण 40 कसोटी, 304 एकदिवसीय आणि 58 टी-20 सामने खेळले.युवराजने आपल्या कारकिर्दीत 304 एकदिवसीय सामन्यात 8,701 धावा केल्या त्यामध्ये त्याने 14 शतके व 52 अर्धशतके झळकावली. युवराज सिंगने 40 कसोटी सामन्यामध्ये 33.92 च्या सरासरीने 1900 धावा केल्या त्यामध्ये त्याने तीन शतक व 11 अर्धशतक झळकावली आहेत. त्याने 58 टी 20 सामन्यात 8 अर्धशतकासह 1177 धावा केल्या आहेत. तर 28 विकेट देखील त्याच्या नावे आहेत.
सलग सहा षटकार
डावखुरा खेळाडू युवराज याने 2007 च्या आयसीसी टी-20 स्पर्धेत इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉड याच्या षटकात सलग सहा षटकार मारण्याचा विक्रम केला होता. त्यावेळी त्याने 12 चेंडूमध्ये अर्धशतकही टोलवित विक्रम केला होता. 2011 च्या एक दिवसीय सामन्यांच्य विश्वचषक स्पर्धेत त्त्याने तीनशेपेक्षा जास्त धावा व पंधरा विकेट्स अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू होण्याचा मान मिळविला.
“अष्टपैलू खेळाडू म्हणून आपला स्वतंत्र ठसा उमटविणार खेळाडू म्हणून युवराज मला सतत प्रेरणादायी मित्र ठरला आहे. त्याची निवृत्ती आस्कमित नसली तरीही त्याने देशासाठी केलेली अतुलनीय कामगिरी सर्वांना प्रोत्साहान देणारी असेल.
-विराट कोहली, भारतीय कर्णधार
कर्करोगाशी सामना
युवराज याला 2011 मध्ये फुफुसाचा कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले. उपचारासाठी त्याला अमेरिकेत जावे लागले. 2012 च्या मार्चमध्ये तीन केमोथेरपीनंतर तो मायदेशी परत आला. 2012 मध्ये त्याने टी-20 विश्वचषकापूर्वी क्रिकेटमध्ये पर्दापण केले.





