Yugendra Pawar – आता पवार विरुद्ध पवार लढाई नको, तशी आमची इच्छाही नाही, अशा स्पष्ट शब्दांत राष्ट्रवादीचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी परखडपणे भूमिका मांडली. आमदार रोहित पवार यांनी 2029 च्या निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या वक्तव्यावर युगेंद्र पवार यांनी भूमिका मांडली. 2029 मध्ये बारामती विधानसभा मतदारसंघात, जय विरुद्ध युगेंद्र अशी लढत होऊ शकते. असे जे रोहित पवार म्हणाले, ते त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं. यापूर्वी लोकसभेला आणि विधानसभेला पवार विरुद्ध पवार असं एकमेकांविरुद्ध लढलो त्याचं दु:ख आहे. पण, आम्ही कुटुंब म्हणून एकत्र आलेलो आहेत. राज्यात होत असलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुनेत्रा पवार यांनी भल्या सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावत सर्व बारामतीकरांना मतदान करण्याचे आवाहन केले. दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत असून पवार कुटुंब या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आले आहे. शरद पवार आज स्वत: मतदानाला उपस्थित नसले तरीही त्यांनी सुनेत्रा पवार यांना मतदान करण्याचे आवाहन बारामतीकरांना केले. त्यामुळे, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरुद्ध निवडणुकीच्या मैदानात असलेले पवार कुटुंब या निवडणुकीत एकत्र दिसून आले. मात्र, 2029 च्या निवडणुकीची देखील चर्चा या अनुषंगाने होत आहे. त्यातच युगेंद्र पवार यांनी 2029 च्या निवडणुकीसंदर्भाने मोठे वक्तव्य केले आहे.