विरोधी पक्षाच्या दर्जापासून YSR कॉंग्रेस राहणार वंचित

अमरावती –आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय.एस.जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर कॉंग्रेस पक्षाला विरोधी पक्षाच्या दर्जापासून वंचित रहावे लागणार आहे. तशी स्पष्टोक्ती आंध्रचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी सोमवारी केली.
वायएसआर कॉंग्रेसचे केवळ ११ आमदार आहेत. त्यामुळे त्या पक्षाला ५ वर्षांसाठी (२०२४ ते २०२९) विरोधी पक्षाचा दर्जा देता येऊ शकणार नाही. तशा प्रकारचा दर्जा देण्याविषयीचा निर्णय मुख्यमंत्री एन.चंद्राबाबू नायडू किंवा मी घेऊ शकत नाही. तो निर्णय नियम-निकषांनुसार ठरतो.
केवळ विरोधी पक्षाचा दर्जा देण्याची मागणी केल्याने तो दिला जाऊ शकत नाही, असे कल्याण पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले. वायएसआर कॉंग्रेसच्या आमदारांनी विरोधी पक्षाचा दर्जा देण्याच्या मागणीशी संबंधित घोषणाबाजी विधानसभेत केली. तसेच, त्या मुद्द्यावरून कामकाजावर बहिष्कार टाकला. त्यानंतर कल्याण यांनी आंध्र सरकारची बाजू मांडली.
आंध्रात मागील वर्षी लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुका झाल्या. विधानसभेच्या केवळ ११ जागा जिंकता आल्याने नामुष्कीजनक पराभव झालेल्या वायएसआर कॉंग्रेसला सत्ता गमवावी लागली. त्या राज्यात विधानसभेच्या एकूण १७५ जागा आहेत. त्यातील किमान १० टक्के जागा जिंकणे विरोधी पक्षाच्या दर्जासाठी अनिवार्य आहे.





