वायएसआर कॉंग्रेसचे नेते आर.कृष्णय्या यांचा खासदारकीचा राजीनामा

नवी दिल्ली : आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय.एस.जगनमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआर कॉंग्रेसचे नेते आर.कृष्णय्या यांनी मंगळवारी खासदारकीचा राजीनामा दिला. तसे पाऊल उचलणारे ते त्या पक्षाचे तिसरे राज्यसभा सदस्य ठरले. त्यामुळे वायएसआर कॉंग्रेस पक्षाला लागलेली गळती थांबण्याची चिन्हे नाहीत.
राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांच्याकडे कृष्णय्या यांनी राजीनामा सादर केला. तो तातडीने मंजूर करण्यात आला. याआधी राज्यसभेची खासदारकी सोडणाऱ्या वायएसआर कॉंग्रेसच्या दोन्ही नेत्यांनी आंध्रातील सत्तारूढ तेलगू देसम पक्षात (टीडीपी) प्रवेश करण्याचा मानस जाहीर केला आहे. कृष्णय्या हेही तसाच निर्णय घेऊ शकतात.
तिघांच्या राजीनाम्यामुळे वायएसआर कॉंग्रेसचे राज्यसभेतील संख्याबळ घटून ९ इतके झाले आहे. आंध्रात लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणूक झाली. त्यामध्ये सपाटून मार खाल्ल्याने वायएसआर कॉंग्रेसला त्या राज्याची सत्ता गमवावी लागली. त्यानंतर त्या पक्षाला एकापाठोपाठ एक असे राजकीय हादरे बसत आहेत. विविध स्तरांवरील नेत्यांची त्या पक्षातून बाहेर पडण्याची लगबग सुरू झाली आहे.





