satara | वाईच्या ऋग्वेदने तयार केलेल्या रोव्हरची ‘इस्त्रो’ मध्ये निवड

वाई, (प्रतिनिधी)- येथील ऋग्वेद मिलिंद उपाध्ये सध्या भोपाळ येथील आयशरच्या संशोधन विभागात चौथ्या वर्षात शिक्षण घेत असून त्याने तयार केलेल्या रोव्हरची निवड इस्त्रोमध्ये झाली आहे. संशोधन क्षेत्रात सध्या भारत अग्रेसर ठरु पहात आहे. इस्त्रोच्या माध्यमातून विविध अंतराळ मोहिमा आखल्या जातात. त्यामुळे अंतराळ संशोधनाबाबत भारतकडे जगाच्या नजरा आहेत.
अनेकांची शास्त्रज्ञ म्हणून इस्त्रोमध्ये जाण्याची इच्छा असते. वाई शहरातील ऋग्वेद उपाध्ये याने तयार केलेल्या रोव्हरची निवड इस्त्रोमध्ये झाल्यामुळे त्यांच्या प्रकल्पाची निवड वाईकर तसेच सातारकरांसाठी अभिमानाची बाब आहे.
ऋग्वेदला शास्त्रज्ञ बनायचे आहे. भोपाळमध्ये शिक्षण सुरु असताना चार दिवसांंपूर्वी त्याच्याकडे रोव्हरचा प्रोजेक्ट आला होता. तो त्याने पूर्ण केला. त्याने केलेल्या रोव्हरचा प्रोजेक्ट इस्त्रोला पाठवण्यात आला असून तेथेही सिलेक्ट झाल्याचे त्याचे वडील मिलिंद उपाध्ये यांनी सांगितले.
मिलिंद उपाध्ये वाई येथील आयटीआयमध्ये प्राचार्य आहेत. ऋग्वेद याने वाई येथील तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी विद्यालयात दहावीमध्ये ९२ टक्के तर दिशा कॉलेजमध्ये बारावीसाठी ९० टक्के गुण मिळवले होते. पुढे त्याने शास्त्रज्ञ बनण्यासाठी भोपाळ येथे प्रवेश घेतला. त्याची आई प्रिती उपाध्ये पंचवक्र फाउंडेशनच्या समन्वयक म्हणून काम करतात. वाईकरांसह जिल्ह्यातून ऋग्वेदचे अभिनंदन केले जात आहे.





