सध्या देशात दुसरा लॉकडाऊन सुरू झाला असून अशा परिस्थितीत संपूर्ण देश सेल्फ आयसोलेशनमध्ये आहे. बॉलिवूडचा सुलतान अर्थात सलमान खाननेही स्वत:ला सेल्फ-क्वारंटइन केले आहे. लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी तो पनवेलमधील त्याच्या फार्म हाऊसमध्ये गेला होता आणि तेव्हापासून तेथेच आहे. या फॉर्म हाऊसमध्ये सलमानसोबत सोहेल खानचा मुलगा आणि त्याचा पुतण्या निर्वाना आहे.
या काळात सलमानने त्याच्या इन्स्टाग्रामवर काही व्हिडिओ पोस्ट केले आहेत ज्यामध्ये तो काय-काय करतोय हे दिसते. त्यातच सलमानने आता आपल्या चाहत्यांशी संपर्क साधण्यासाठी स्वतःचे यूट्यूब चॅनेल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सलमान लवकरच “बीट सलमान खान’ म्हणून आपले यूट्यूब चॅनल सुरू करणार आहे, असे सलमानच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
या चॅनेलमध्ये सलमान त्याच्या आयुष्याशी संबंधित गोष्टी, घटना आणि आपल्या दैनंदिनीसह त्याच्या टीमच्या गोष्टी तसेच आजूबाजूच्या लोकांच्या प्रेरणादायी गोष्टी शेअर करणार आहे. सलमानचे यूट्यूब चॅनल सध्या पनवेल फॉर्म हाऊसवरून लाइव्ह करण्यात येणार आहे. या चॅनेलची सर्व तांत्रिक कामे मुंबईहून सलमानच्या टीमद्वारे केली जाणार आहे.
या चॅनेलवर काय पोस्ट केले जाईल, याचा निर्णय खुद्द सलमान खान घेणार आहे. या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तो आपल्या चाहत्यांच्या अधिक जवळ येईल, असे सलमानला वाटते. सलमानची स्वत:ची फॅन फॉलोइंग आहे, जे सलमानबरोबर अनेक वर्षांपासून आहे.