कराड : वाघेरी येथील युवकाचे लग्न ठरले असताना मुलीच्या भावकीतील एकाने संबंधित युवकास मित्रांच्या मदतीने मारहाण केली. त्यामध्ये संबंधित युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. पंकज पोपट कदम (वय २२, रा वाघेरी) असे या युवकाचे नाव असून त्याने दिलेल्या तक्रारीवरुन विवेक सुहास सत्रे, कैलास विजय माळी (रा. वाघेरी), पारस पिसाळ, अथर्व पिसाळ ( रा. करवडी, ता. कराड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज कदम ओगलेवाडी येथील खासगी कंपनीत कामाला आहे. त्याचे त्याच्याच गावातील एका मुलीशी प्रेमसंबंध होते. त्यानंतर त्या दोघांच्याही कुटुंबीयांनी त्यांचा विवाह ठरवला. तो १६ नोव्हेंबरला होणार होता. पंकज कामावरुन घरी जात असताना मुलीच्या भावकीतील विवेक सुभाष सत्रे, कैलास विजय माळी, पारस पिसाळ व अथर्व पिसाळ यांनी त्याची गाडी ओगलेवाडी येथील रेल्वे फाटकच्या अलीकडे अडवली. तसेच पंकज याच्यावर कोयत्याने वार केले. डोक्यात पाठीमागील बाजूस, उजव्या कानावर, उजव्या गालावर, उजव्या खांद्यावर, बोटावर व हाताचे मनगटावर वार करुन संशयितांनी पंकजला गंभीर जखमी केले. त्यानंतर पंकज जीव वाचविण्यासाठी पळू लागल्यावर त्याचा संबंधितांनी पाठलाग केला. त्यावेळी पंकज झुडपात लपून बसला. काही वेळाने संशयित निघून गेल्याने तो रिक्षातून उपजिल्हा रुग्णालयात आला. तेथे त्याच्यावर उपचार करुन पुढील उपचारासाठी कृष्णा हॉस्पिटलला दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरु असून त्याने दिलेल्या तक्रारीवरुन संबंधित विवेक सुहास सत्रे, कैलास विजय माळी, पारस पिसाळ, अथर्व पिसाळ या संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.