Narendra Modi – आज देश अंतराळ क्षेत्रात एक अभूतपूर्व संधी असल्याचे पाहत असून खाजगी क्षेत्राच्या प्रगतीमुळे भारताची अंतराळ परिसंस्था मोठी झेप आहे. स्कायरूटचे इन्फिनिटी कॅम्पस हे भारताची नवीन विचारसरणी, नवोन्मेष आणि युवाशक्तीचे प्रतिबिंब आहे. युवकांची जोखीम घेण्याची क्षमता आणि उद्योजकता नवीन उंची गाठत आहे. आगामी काळात जागतिक उपग्रह प्रक्षेपण परिसंस्थेत भारत आघाडीचा देश म्हणून कसा उदयास येईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हैदराबाद येथे स्कायरूटच्या इन्फिनिटी कॅम्पसचे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केले. यावेळी ते बोलत होते. पंतप्रधान पुढे म्हणाले की, भारताचा अंतराळ प्रवास मर्यादित संसाधनांपासून सुरू झाला मात्र देशाच्या महत्त्वाकांक्षा कधीही मर्यादित नव्हत्या. सायकलवरून रॉकेटचे सुटे भाग घेऊन जाण्यापासून ते जगातील सर्वात विश्वासार्ह प्रक्षेपण वाहने विकसित करण्यापर्यंत भारताने मजल मारली आहे. स्वप्नांची उंची संसाधनांनी नव्हे तर दृढ संकल्पाने निश्चित केली जाते. इस्रोने गेली अनेक दशके भारताच्या अंतराळ प्रवासाला भरारी घेण्यासाठी नवीन पंख दिले आहेत आणि विश्वासार्हता, क्षमता आणि मूल्य यांनी या क्षेत्रात भारताची वेगळी ओळख स्थापित केली असल्याचे देखील मोदींनी बोलताना स्पष्ट केले. भारतातील तरुण नेहमीच राष्ट्रहिताला प्राधान्य देत आहेत. प्रत्येक संधीचा सर्वोत्तम वापर कसा करता येवू शकेल याचा देखील विचार करत आहेत. त्यामुळे सरकारने जेव्हा आंतराळ क्षेत्र खुले केले त्यावेळी देशातील जनरेशन झेड त्याचा पुरेपुर फायदा घेण्यासाठी पुढे आले आहेत. त्यामुळेच सध्याच्या घडीला 300 पेक्षा अधिक अंतराळ स्टार्ट-अप्स भारताच्या अंतराळ भविष्याला नवीन आशा देत आहेत, असे बोलताना मोदींनी नमुद केले. गुंतवणुकदारांसाठी आंतराळ आकर्षणाचे केंद्र जनरेशन झेडचे अभियंते, डिझाइनर्स, कोडर्स आणि वैज्ञानिक नव्या तंत्रज्ञानाची निर्मिती वेगवेगळ्या क्षेत्रात करत आहेत. काही वर्षांपूर्वी अकल्पनीय वाटणाऱ्या क्षेत्रांमध्ये भारतातील युवक काम करत आहेत. भारतातील खाजगी अंतराळ प्रतिभा जगासमोर एक वैशिष्ट्यपूर्ण ओळख निर्माण करत आहे त्यामुळेच आज जागतिक गुंतवणूकदारांसाठी भारताचे अंतराळ क्षेत्र हे एक आकर्षणाचे स्थान झाले आहे, असे देखील मोदींनी आपल्या भाषणात म्हटले.