पुणे जिल्हा | न्हावी येथील युवकांची जेसीबी प्लँटला भेट

लोणी देवकर, (वार्ताहर) – इंदापूर तालुक्यातील तीन हजार लोकसंख्या असलेल्या न्हावी गावामध्ये अनेक युवकांनी पारंपरिक शेतीला फाटा देत नवनवीन व्यवसायाकडे वळण्याचा मार्ग स्वीकारला आहे. यामध्ये प्रामुख्याने शेतीसोबतच दूध व्यवसाय, कुक्कुटपालन व्यवसाय, रेशीम उद्योग तसेच जेसीबी आणि पोकलेन व्यवसायामध्ये न्हावी गावातील युवकांची संख्या लक्षणीय आहे.
सध्याच्या काळात उच्च शिक्षण घेऊन मनासारखी नोकरी मिळत नसल्याने तसेच शासकीय नोकरीची शाश्वती नसल्याने न्हावी गावातील युवक पोकलेन आणि जेसीबी व्यवसायाच्या माध्यमातून संपूर्ण भारतात आपला व्यवसाय करीत आहेत.
मागील 15 वर्षांपासून येथील युवकांनी या व्यवसायाकडे पूर्णवेळ व्यवसाय म्हणून पाहिले आहे. याच्या माध्यमातून अनेक युवकांनी आपला आर्थिक सामाजिक स्तर उंचावून गावाच्या प्रगती मध्ये आपला हातभार लावला आहे.
तळेगाव पुणे येथील जेसीबी कंपनीने न्हावी गावातील युवकांना आमंत्रित करून कंपनीमध्ये तयार होणार्या यंत्रसामग्री, त्याची कार्यक्षमता, त्यातील बदल, नवीन तंत्रज्ञान आदी विषयी मार्गदर्शन केले. गावातील जवळपास 20हून अधिक युवकांनी या पोकलेन निर्मिती कारखान्याला भेट दिली.
यावेळी जेसीबी कारखान्याचे व्यवस्थापन अमित राणे, अमित जोग यांनी कारखान्याच्या जोडणी आणि निर्मिती शाखाविषयी युवकांना सविस्तर माहिती दिली. यावेळी न्हावी गावातील उद्योजक राजकुमार रासकर, प्रकाश रासकर, स्वप्नील कणसे, साहेबराव चोपडे आदींसह युवक वर्ग उपस्थित होता.
पोकलेनचे गाव – न्हावी गाव
साधारण तीन हजार लोकसंख्या असलेल्या गावामध्ये शेतकरी कुटुंबातील युवकांकडे जवळपास 120हून अधिक पोकलेन आणि जेसीबी यंत्र आहेत. राज्यासह संपूर्ण भारत देशात न्हावी गावची एक विशिष्ट ओळख निर्माण झाली आहे. देशाच्या कोणत्याची कोपर्यात न्हावी गावातील एखाद्या युवकाचे पोकलेन कार्यरत असणारे एकमेव न्हावी गाव आहे.





