नागठाणे – माजगाव (ता. सातारा) येथील एका 35 वर्षांच्या युवकाचा करोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त बुधवारी सकाळी सोशल मीडियावरून समजताच माजगाव व नागठाणे परिसरात पुन्हा एकदा घबराट पसरली होती; परंतु या बाधित युवकाचा प्रवास मुंबईतून थेट कराडला झाल्याने आणि त्याचा माजगावात संपर्कच आला नसल्याचे समजताच ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला. आरोग्य विभागाने मात्र खबरदारीचा उपाय म्हणून गावात तपासणी मोहीम सुरू केली आहे. सोशल मीडियावरील या बातमीची दखल घेत नागठाणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. जी. कांबळे, डॉ. पराग जोशी व कर्मचाऱ्यानी तातडीने माजगावात धाव घेतली. बाधित युवक कुटुंबासमवेत मुंबईला वास्तव्यास असून कराडजवळ त्याची सासुरवाडी आहे. तो तीन दिवसांपूर्वी मुंबईतून थेट कराडला गेला होता. तेथे त्याला त्रास होऊ लागल्याने खावली, ता. सातारा येथे क्वारंटाइन करण्यात आले होते. त्याच्या घशातील स्रावाचा नमुना काल (दि. 2) तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे बुधवारी समजले. खावली येथे करोना केअर सेंटरमध्ये दाखल होताना त्याने मूळ गाव माजगाव (ता. सातारा) असा पत्ता दिल्याने सोशल मीडियावर माजगाव येथे करोनाबाधित आढळल्याच्या पोस्ट व्हायरल झाल्या. त्याचा माजगावशी संपर्क आला नसल्याचे निष्पन्न झाले.