Youth Congress Protest – लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या नीट परीक्षेतील गैरव्यवस्था, पेपरफुटी आणि भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे गुडलक चौकात तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी नीट चा प्रतीकात्मक पुतळा जाळून केंद्र सरकार, शिक्षण मंत्रालयाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनात युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, मीडिया विभाग अध्यक्ष अक्षय जैन, प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश अबनावे यांच्यासह मोहसीन शेख, भूषण रानभरे, सौरभ अमराळे, अंजनेय साठे, अथर्व सोनार, सद्दाम शेख, अभिषेक अवचार, निखिल मलके, सागर धाडवे, ओंकार मोरे, विशाल कामेकर, दिनेश सरताळे, विकास सुपनार, ॲड. सूरज, मोरे, तेजस बनसोड आदी पदाधिकारी उपस्थित होते. शिक्षण व्यवस्थेचे पूर्णपणे राजकारण करणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध करत युवक काँग्रेसने केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. नीट परीक्षा आता गुणवत्तेची नसून भ्रष्टाचाराची परीक्षा बनली असल्याची टीका शिवराज मोरे यांनी केली. जे सरकार परीक्षा सुरक्षित ठेवू शकत नाही, ते देशाचे भविष्य काय सुरक्षित ठेवणार? विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची राख करणाऱ्या सरकारविरोधात युवक काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्यावर बुलडोझर चालवणाऱ्यांना जनता माफ करणार नाही, असे अक्षय जैन यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या कष्टावर पाणी फेरणाऱ्या व्यवस्थेविरोधात आता विद्यार्थी, युवक रस्त्यावर उतरतील. नीट घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी प्रथमेश अबनावे यांनी केली.