Pimpri : थर्टी फर्स्टच्या नियोजनात तरूणाई व्यस्त

नाणे मावळ, : थर्टी फर्स्ट अर्थात सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी अद्याप दहा दिवस बाकी आहेत. मात्र सर्वच वयोगटातील नागरिकांकडून थर्टी फर्स्टसाठी आतापासून नियोजन सुरु झाले आहे. सोबत ठिकठिकाणच्या व्यावसायिकांकडूनही थर्टी फर्स्टसाठी विशेष नियोजन केले जात आहे. मावळ तालुका हा पर्यटनाचा तालुका आहे. त्यामुळे चालू वर्षाला निरोप देण्यासाठी व नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक नागरिक पर्यटनस्थळी ३०-३१ डिसेंबर रोजी गर्दी करतात. या सर्वांना आतापासूनच थर्टी फर्स्टचे वेध लागले आहेत.
थर्टी फर्स्ट जल्लोषात साजरा करण्यासाठी आतापासून बेत रचले जाऊ लागलेत. समाजमाध्यमांवर, व्हॉट्सअप ग्रुप्सवर गेल्यावर्षी कसा जल्लोष झाला, यावर्षी थर्टी फर्स्ट कुठे अन् कसा साजरा करायचा? याची चर्चा होताना दिसते. २०२४ वर्ष संपण्यासाठी फक्त दहा दिवस बाकी असून तरुणाईला ३१ डिसेंबरचे वेध लागलेत. तसं पाहता पूर्वी थर्टी फर्स्ट साजरा करायचा असतो, असे काही सूत्र नव्हते. परंतु अलीकडच्या काळात या दिवसाला एका उत्सवाचे स्वरुप प्राप्त झाले आहे.
हल्ली नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सुटी घेणे, प्रवास करणे, पर्यटन करणे, ओली-सुकी पार्टी करणे, मौज मस्ती करणे, कुटुंबासोबत नवीन वर्षाचे वेलकम करणे असे प्रघात पडले आहेत. मावळात तर अनेक पर्यटनस्थळी पाय ठेवायला जागा नसते, इतकी गर्दी होते. लोणावळा-खंडाळा, पवना यांसोबत आता आंदर मावळ, नाणे मावळ भागातही पर्यटकांचा ओढा वाढू लागला आहे.
हुल्लडबाजांवर नियंत्रण हवे
मावळ हा निसर्गाने भरपूर तालुका आहे. त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेकजण मावळ तालुक्यात येत असतात. परंतु या पर्यटकांत काही अतिउत्साही, बेशिस्त पर्यटक असतात. ज्यांच्याकडून धिंगाणा घालणे, रस्त्यात गाडी लावून नाचणे, आरडाओरडा करणे, महिलांचे छेड काढणे, दारूच्या बाटल्या फोडल्या, उघड्या वातावरणात विनाशर्ट अर्धनग्न स्वरुपात वावरणे, मद्य प्राशन करणे आदी प्रकार केला जातो. यातून अनेकदा वादविवाद व अपघात घडतात. त्यामुळे अशा हुल्लडबाज पर्यटकांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.





